YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 1:3-11

प्रेषित 1:3-11 MRCV

त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा. कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.” मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?” ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.” असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले. येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.”

प्रेषित 1:3-11 साठी चलचित्र