YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 1:1-21

प्रेषित 1:1-21 MRCV

थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून, त्यांच्या निवडलेल्या प्रेषितांना पवित्र आत्म्याद्वारे आज्ञा केल्यानंतर येशू वर स्वर्गात घेतले गेले, त्या दिवसापर्यंत घडलेल्या गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले. अशाच एका प्रसंगी, ते त्यांच्याबरोबर भोजन करीत असताना, त्यांनी आज्ञा केली: “यरुशलेम सोडून जाऊ नका, तर माझ्या पित्याने अभिवचन दिलेल्या ज्या देणगीबद्दल तुम्ही मला बोलताना ऐकले होते, त्याची वाट पाहा. कारण योहान पाण्याने बाप्तिस्मा करीत होता, परंतु थोड्या दिवसातच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केला जाईल.” मग ते त्यांच्याभोवती गोळा झाले आणि त्यांनी विचारले, “हे प्रभू, यावेळी आपण इस्राएलच्या राज्याची पुनर्स्थापना करणार आहात काय?” ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही. परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.” असे म्हटल्यानंतर ते त्यांच्या नजरेसमोर वर घेतले गेले आणि ढगांनी त्यांना त्यांच्या दृष्टिआड केले. येशू जसे वर घेतले जात होते तसे त्यांचे शिष्य आकाशाकडे निरखून लावून पाहत होते, एकाएकी पांढरी वस्त्रे घातलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, “अहो गालीलातील मनुष्यांनो, तुम्ही येथे आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हेच येशू, ज्यांना तुमच्यापासून वर स्वर्गात घेतले गेले, जसे तुम्ही त्यांना स्वर्गात जाताना पाहत आहात तसेच परत येणार आहेत.” नंतर प्रेषित सुमारे शब्बाथ दिवसाच्या वाटचालीवर अंतरावर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर होते तिथून ते यरुशलेमला परत आले. तिथे पोहोचल्यावर, ते राहत होते त्या माडीवरील खोलीत गेले. तिथे जे शिष्य उपस्थित होते ते हे: पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया; फिलिप्प आणि थोमा; बर्थलमय आणि मत्तय; अल्फीचा पुत्र याकोब, शिमोन कनानी आणि याकोबाचा पुत्र यहूदाह. हे सर्वजण व येशूंची आई मरीया, त्यांचे भाऊ, इतर स्त्रिया एकत्र येऊन सतत प्रार्थनेत वेळ घालवित असत. त्या दिवसांमध्ये पेत्र विश्वासणार्‍या लोकांमध्ये उभा राहिला (ते एकूण एकशेवीस लोक होते) आणि त्याने भाषण दिले. तो म्हणाला, “बंधू भगिनींनो, येशूंना अटक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणारा यहूदाहच्या संदर्भात फार पूर्वी दावीद राजाद्वारे पवित्र आत्म्याने भाकीत केलेला शास्त्रलेख पूर्ण होणे आवश्यक होते. तो आपल्यापैकीच एक होता आणि त्याने आपल्या सेवाकार्यामध्ये भाग घेतला होता.” यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली. ही वार्ता यरुशलेमात राहणार्‍या सर्वांना समजली, तेव्हापासून त्या शेताला त्यांच्या भाषेत हकलदमा, म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले. “यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; व त्यात कोणीही वस्ती न करो,’ आणि, “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’ यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे

प्रेषित 1:1-21 साठी चलचित्र