“अबशालोमसाठी राजा रडत आहे आणि शोक करीत आहे हे योआबाला सांगण्यात आले.” आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.” युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली. तेव्हा राजाने आपला चेहरा झाकला आणि मोठ्याने रडला, “हे माझ्या पुत्रा, अबशालोमा! हे अबशालोमा माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”
नंतर योआब घरात राजाकडे गेला आणि म्हणाला, “आज तुम्ही तुमच्या सर्व सैन्याला अपमानित केले आहे, ज्यांनी तुमचा जीव वाचविला आणि तुमची मुले, मुली, तुमच्या पत्नी व उपपत्नींना वाचविले आहेत. तुमचा द्वेष करणार्यांवर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्यावर प्रेम करणार्यांचा तुम्ही द्वेष करता. आज तुम्ही हे स्पष्ट केले आहे की, सेनापती आणि त्यांची माणसे यांचे तुम्हाला काही वाटत नाही. मला तर असे वाटते की आज जर आम्ही सर्व मेलो असतो आणि अबशालोम जिवंत असता तर तुम्हाला आनंद झाला असता. तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.”
तेव्हा राजा उठला आणि शहराच्या वेशीकडे आपल्या स्थानी जाऊन बसला. जेव्हा माणसांना सांगण्यात आले, “राजा वेशीकडे बसला आहे,” तेव्हा ते सर्वजण त्याच्यासमोर आले.
या दरम्यान इस्राएली लोक त्यांच्या घरांकडे पळून गेले.
इस्राएलच्या सर्व गोत्रातील लोकांचा आपसात वाद चालू होता, ते म्हणत होते, “राजाने आम्हाला आमच्या शत्रूच्या हातातून सोडविले आहे; तोच आहे ज्याने पलिष्ट्यांच्या हातातून आमची सुटका केली. परंतु आता अबशालोममुळे तो देशातून पळून गेला आहे; आणि अबशालोम ज्याला आम्ही आमच्यावर राज्य करण्यासाठी अभिषेक केला, तो युद्धात मारला गेला आहे. तेव्हा राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काहीच का बोलत नाही?”
दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात? तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’ आणि अमासाला असे म्हणा, ‘तू माझ्या हाडामांसाचा नाहीस काय? योआबाच्या जागी तू माझ्या सैन्याचा सेनापती झाला नाहीस तर परमेश्वर मला अधिक कठोर शिक्षा करो.’ ”
अशाप्रकारे दावीदाने यहूदाह गोत्राच्या लोकांची मने जिंकून त्यांना एकमत केले. त्यांनी राजाकडे निरोप पाठवला, “तुम्ही आणि तुमची सर्व माणसे, परत या.” नंतर राजा परतला आणि यार्देनपर्यंत गेला.
यहूदाहचे लोक गिलगाल येथे राजाला भेटण्यास आणि त्यांना यार्देनेच्या पार नेण्यास आले. यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला. त्याच्याबरोबर बिन्यामीन कुळातील एक हजार माणसे होती, त्याचप्रमाणे शौलाच्या घराचा कारभारी सीबा आणि त्याचे पंधरा पुत्र आणि वीस सेवक हे त्याच्याबरोबर होते. यार्देनेकडे जिथे राजा होता तिथे ते घाईने गेले. राजाच्या घराण्याला घेण्यासाठी आणि राजाला हवे त्याप्रमाणे करण्यास, ते नदीचे पात्र पार करून आले.
जेव्हा गेराचा पुत्र शिमी यार्देन पार करून आला, तेव्हा तो राजासमोर उपडा पडला. आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे. कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.”
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”
तेव्हा दावीद म्हणाला, “जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला त्याचे काय? तुम्हाला लुडबुड करण्याचा अधिकार कोणी दिला? इस्राएलमध्ये आज कोणाचा मृत्यू व्हावा काय? आज मी इस्राएलचा राजा आहे हे मला समजत नाही काय?” तेव्हा राजाने शिमीला म्हटले, “तू मरणार नाहीस.” आणि राजाने त्याला शपथ घेऊन अभिवचन दिले.
शौलाचा नातू, मेफीबोशेथ सुद्धा राजाला भेटण्यास गेला. राजा यरुशलेम सोडून गेल्यापासून सुरक्षित परत येईपर्यंत त्याने आपल्या पायांची काळजी घेतली नव्हती, किंवा दाढी केली नव्हती किंवा कपडे धुतले नव्हते. जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”
तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले. परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे. माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?”
राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”
मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.”