इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा. जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!” मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला. जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.” येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?” त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.” मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो. तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे. कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र. नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन. ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला. येहू आपल्या सोबतच्या अधिकार्यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?” येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.” तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.” येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ” हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.”
2 राजे 9 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 राजे 9:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ