मग आमोजाचा पुत्र यशायाहने हिज्कीयाह राजाला हा संदेश पाठविला: “इस्राएलचे परमेश्वर याहवेह म्हणतात: अश्शूरचा राजा सन्हेरीबविषयीची तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. त्याच्याविरुद्ध बोललेले याहवेहचे वचन हे आहे: “सीयोनाची कुमारी कन्या तुझा उपहास आणि तिरस्कार करते. यरुशलेम कन्या तुझे पलायन बघून आपले डोके हालविते. तू कोणाचा उपहास व निंदा केलीस? तू कोणाविरुद्ध उंच आवाजात बोललास व गर्विष्ठपणाने कोणाकडे नजर उचलून बघितलेस? इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराविरुद्ध तू हे केलेस! तुझे दूत पाठवून तू प्रभूची चेष्टा केली. आणि तू म्हणतोस, ‘मी माझ्या अनेक रथांनी उंचच उंच पर्वतावर चढून गेलो, लबानोनच्या सर्वात उंच पर्वतावर गेलो. मी तिचे सर्वात उंच देवदारू तोडले, निवडक गंधसरू तोडले. मी तिच्या दुर्गम भागात पोहोचलो तिच्या अत्यंत उत्तम जंगलात गेलो. अनेक परकीय देशात मी विहिरी खणल्या आणि तेथील पाणी प्यालो. माझ्या पावलाच्या तळव्याने मी मिसरचे सर्व झरे आटवून टाकले.’ ” “ ‘हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास. त्यांच्या लोकांची शक्ती कमी होत गेली, ते निराश व लज्जित झालेले आहेत. ते शेतातील पिकासारखे, कोवळी पाने आलेल्या रोपासारखे, छतावर उगविलेल्या गवतासारखे, पूर्ण वाढण्याआधीच उन्हाने करपून गेलेले होते. “ ‘परंतु मी जाणतो तू कुठे आहेस तू कधी जातो व येतो आणि तू माझ्यावर कसा संतापतोस. कारण तू माझ्यावर संतापतो व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे, मी तुझ्या नाकात वेसण अडकवेन व तुझ्या तोंडात लगाम घालेन आणि मग तू आलास त्याच वाटेने तुझ्याच देशात तुला परत नेईन.’ “हिज्कीयाह, तुझ्यासाठी हे चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल. पुन्हा एकदा यहूदीया राज्यातील अवशिष्ट लोक जमिनीत रुजाल आणि फलद्रृप व्हाल. यरुशलेममधून अवशिष्ट लोक येतील, सीयोन पर्वतातून वाचलेल्याची टोळी येईल. सर्वसमर्थ याहवेहच्या आवेशाने हे सर्व घडून येईल. “म्हणून अश्शूरच्या राजाविषयी याहवेह असे म्हणतात: “ ‘तो या शहरात प्रवेश करणार नाही किंवा एखादा बाणही सोडणार नाही. तो या ठिकाणी ढाल घेऊन येणार नाही किंवा तटबंदीबाहेर मोर्चे बांधणार नाही. ज्या रस्त्याने तो आला, त्याच रस्त्याने तो परत जाईल; तो या शहरात प्रवेश करणार नाही, असे याहवेह घोषित करतात. माझ्याकरिता आणि माझा सेवक दावीदाच्या स्मरणार्थ, मी या यरुशलेम नगराचे रक्षण करेन!’ ” त्या रात्री याहवेहच्या दूताने अश्शूर सैनिकांच्या छावणीत एक लक्ष पंचाऐंशी हजार सैनिक ठार केले. दुसर्या दिवशी सकाळी लोक उठून पाहतात—तर त्यांच्या सर्व बाजूला प्रेते पसरलेली होती. म्हणून अश्शूरचा राजा सन्हेरीबने छावणी उठविली व तो माघारी परतला. तो निनवेहला परत गेला व तिथेच राहिला. एके दिवशी, तो निस्रोख या त्याच्या दैवताच्या मंदिरात पूजा करीत असताना, त्याचे पुत्र अद्राम्मेलेक व शरेसर यांनी तलवारीने त्याचा वध केला व ते अरारात देशात पळून गेले. नंतर त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र एसरहद्दोन राजा झाला.
2 राजे 19 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 राजे 19:20-37
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ