YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 10:1-17

2 राजे 10:1-17 MRCV

शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते, “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच, आपल्या धन्याच्या पुत्रांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य निवडा आणि त्याला त्याच्या पित्याच्या सिंहासनावर बसवा. मग तुमच्या धन्याच्या घरासाठी लढा.” परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?” मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.” मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.” आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते. जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली. जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.” तेव्हा येहूने आदेश दिला, “ती शिरे मुख्य वेशीजवळ, त्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत ठेवावी.” दुसर्‍या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले? तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.” असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही. यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला, त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही अहज्याहचे नातेवाईक आहोत आणि आम्ही राजा आणि राजमातेच्या कुटुंबीयांनी अभिवादन करण्यासाठी खाली आलो आहोत.” तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही. तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?” यहोनादाबाने उत्तर दिले, “होय निश्चित!” तेव्हा येहू म्हणाला, “तर मग आपला हात मला दे.” आणि त्याने तसेच केले, आणि येहूने त्याला आपल्या रथामध्ये घेण्यास मदत केली. येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला. जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.

2 राजे 10 वाचा