YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 21:1-15

1 शमुवेल 21:1-15 MRCV

दावीद नोब येथे अहीमेलेख याजकाकडे गेला. अहीमेलेख भीतीने कापत दावीदाला भेटला आणि विचारले, “तू एकटाच का आहेस? तुझ्याबरोबर कोणीच का नाही?” दावीदाने अहीमेलेख याजकाला उत्तर दिले, “राजाने मला एका कामगिरीवर पाठवले आहे आणि मला सांगितले, ‘ज्या कामगिरीवर मी तुला पाठवित आहे त्याबद्दल कोणालाही माहीत होऊ नये.’ आणि माझ्या माणसांनी मला मी एका ठराविक ठिकाणी भेटावे असे मी त्यांना सांगितले आहे. तर आता, तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे किंवा तुझ्याजवळ जे काही असेल ते दे.” परंतु याजकाने दावीदाला उत्तर दिले, “माझ्याजवळ कोणती साधारण भाकर नाही, तरीही काही पवित्र भाकर येथे आहे, जी माणसे तुझ्याबरोबर आहेत ती मात्र स्त्रियांपासून दूर राहिली पाहिजेत.” दावीदाने याजकाला उत्तर दिले, “नक्कीच, नेहमीप्रमाणे मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा स्त्रियांना आमच्यापासून दूर ठेवतो. कामगिरी पवित्र नसताना सुद्धा माणसांची शरीरे पवित्र असतात. तर आज किती अधिक पवित्र असतील!” तेव्हा याजकाने त्याला समर्पित समक्षतेची भाकर दिली, कारण समर्पित भाकरीशिवाय दुसरी भाकर तिथे नव्हती. जेव्हा ताजी भाकरी याहवेहच्या समक्षतेत ठेवली जात असे तेव्हा शिळी भाकर काढून टाकली जात असे. त्या दिवशी शौलाचा एक सेवक तिथे होता, ज्याला याहवेहसमोर थांबवून ठेवले गेले होते; तो शौलाचा मुख्य मेंढपाळ दवेग, एदोमी प्रांतातील होता. दावीदाने अहीमेलेखास विचारले, “येथे तुझ्याकडे एखादा भाला किंवा तलवार आहे काय? कारण राजाची कामगिरी इतकी तातडीची होती, मी माझी तलवार किंवा दुसरे कोणतेही शस्त्र आणलेले नाही.” याजकाने उत्तर दिले, “ज्या पलिष्टी गल्याथाला तू एलाहच्या खोर्‍यात ठार मारलेस त्याची तलवार येथे आहे; ती कापडात गुंडाळून एफोदाच्या मागे ठेवलेली आहे. तुला पाहिजे तर ती तू घे; त्या शिवाय दुसरी तलवार येथे नाही.” दावीद म्हणाला, “तिच्यासारखी दुसरी तलवार नाही; ती मला दे.” त्या दिवशी दावीद शौलापासून पळाला आणि गथचा राजा आखीशकडे गेला. परंतु आखीशाचे सेवक त्याला म्हणाले, “हा दावीद, या देशाचा राजा नाही काय? ज्याच्याविषयी त्यांनी असे म्हणून गाईले व नाचले तो हाच नाही काय: “शौलाने हजारांना वधले, आणि दावीदाने दहा हजार वधले?” हे शब्द दावीदाच्या अंतःकरणाला लागले व त्याला गथचा राजा आखीशची भीती वाटली. म्हणून त्याने त्यांच्यासमोर मनोविकृत असल्याचे सोंग घेतले; व तो त्यांच्याबरोबर होता तेव्हा तो वेड्यासारखे वागू लागला, फाटकाच्या दारांवर ओरडू लागला आणि आपल्या दाढीवरून लाळ गाळू लागला. आखीश राजा त्याच्या सेवकांना म्हणाला, “पाहा तो मनुष्य वेडा आहे! त्याला माझ्याकडे का आणले? माझ्याकडे वेडी माणसे कमी आहेत का की हे वेडेचाळे करावयाला या व्यक्तीला तुम्ही माझ्यासमोर आणले आहे? या मनुष्याने माझ्या घरात यावे काय?”

1 शमुवेल 21 वाचा