नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.
त्या दरम्यान पलिष्टी गल्याथही दावीदाच्या जवळ येऊ लागला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. पलिष्ट्याने दावीदाकडे नजर टाकून पाहिले की तो केवळ एक तरुण, तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला रूपवान होता, आणि त्याने दावीदाला तुच्छ मानले. तो दावीदाला म्हणाला, “माझ्यावर काठी घेऊन चालून येण्यास, मी कुत्रा आहे काय?” आणि त्या पलिष्ट्याने आपल्या दैवतांची नावे घेऊन दावीदाला शाप दिला. तो पलिष्टी दावीदाला म्हणाला, “इकडे ये, म्हणजे मी तुझे मांस पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईल.”
दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्याविरुद्ध आलास, परंतु ज्या इस्राएली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखले; त्या याहवेह, सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याविरुद्ध येतो. आज याहवेह तुला माझ्या हाती देईल, मी तुला मारून टाकीन व तुझा शिरच्छेद करेन. या आजच्या दिवशी मी पलिष्टी सैन्याची शरीरे पक्ष्यांना व जंगली जनावरांना देईन आणि सर्व जगाला समजेल की परमेश्वर इस्राएलात आहेत. येथे जमलेल्या प्रत्येकाने जाणावे की तलवार किंवा भाल्याने याहवेह आम्हाला सोडवित नाही; कारण युद्ध याहवेहचे आहे आणि तुम्हा सर्वांना याहवेह आमच्या हाती देतील.”
पलिष्टी गल्याथ जसा दावीदावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागला, तसा दावीद त्याचा सामना करण्यास त्याच्या दिशेने धावत गेला. दावीदाने आपल्या बटव्यातील एक दगड घेऊन, तो गोफणीत घातला व तो त्या पलिष्ट्याच्या कपाळावर मारला. तो दगड त्याच्या कपाळात शिरला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले.
दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले.
जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला. तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते. इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.
दावीदाने त्या पलिष्ट्याचे शिर घेऊन यरुशलेमास आणले; पण त्या पलिष्ट्याची शस्त्रे आपल्या तंबूत ठेवली.
शौलाने दावीदाला पलिष्ट्याशी युद्ध करण्यास जाताना पाहिले, तेव्हा त्याने सेनापती अबनेर याला विचारले, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे?”
अबनेरने उत्तर दिले, “महाराज चिरायू होवो, मला माहीत नाही.”
राजा म्हणाला, “हा तरुण कोणाचा पुत्र आहे त्याचा तपास कर.”
दावीदाने त्या पलिष्ट्याला मारल्यावर परत येताच, अबनेरने त्याला शौलाकडे आणले, त्या पलिष्ट्याचे शिर अजूनही दावीदाच्या हातात होते.
शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?”
दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”