सकाळी लवकरच दावीदाने आपली मेंढरे एका राखणदार्याच्या हाती सोडली, इशायाने सांगितल्याप्रमाणे सर्वकाही घेऊन निघाला. तो छावणीजवळ पोहोचला, तेव्हा सैन्य युद्धाच्या घोषणा देत त्यांच्या लढाईच्या स्थानी जात होते. इस्राएली आणि पलिष्टी सेना समोरासमोर उभ्या राहिल्या. दावीदाने आपल्या वस्तू सामान राखणार्याच्या स्वाधीन केल्या व युद्धभुमीकडे धावत जाऊन त्याच्या भावांना अभिवादन केले. तो त्यांच्याबरोबर बोलत असता, गथ येथील पलिष्टी महाशूरवीर गल्याथ त्याच्या जागेतून बाहेर येऊन नेहमीप्रमाणे ओरडून बोलला, आणि दावीदाने ते ऐकले. त्या मनुष्याला पाहताच इस्राएली लोक मोठ्या भयाने पळून जात असत.
इस्राएली लोक म्हणत होते, “तुम्ही हा मनुष्य बाहेर येताना पाहता ना? तो इस्राएली लोकांना चेतावणी देण्यासाठी बाहेर येतो. जो कोणी त्याला ठार मारेल त्याला राजा मोठी संपत्ती देईल, तो त्याला त्याची कन्या देईल व इस्राएलात त्याचे कुटुंब करमुक्त होईल.”
दावीदाने त्याच्या बाजूला उभे असलेल्या पुरुषांना विचारले, “जो या पलिष्टी मनुष्याला मारेल आणि इस्राएलची ही अप्रतिष्ठा काढून टाकेल, त्याला काय करण्यात येईल? हा बेसुंती पलिष्टी मनुष्य कोण आहे की त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला चेतावणी द्यावी?”
ते जे काही म्हणत आले होते ते त्यांनी त्याला पुन्हा सांगितले आणि म्हणाले, “जो मनुष्य त्याला ठार मारेल त्याचे असे करण्यात येईल.”
जेव्हा दावीदाचा थोरला भाऊ एलियाब याने दावीदाला या लोकांबरोबर बोलत असताना पाहिले, तेव्हा तो त्याच्यावर रागाने भडकला आणि त्याला विचारले, “तू येथे का आलास? आणि ती थोडीशी मेंढरे रानात तू कोणाबरोबर सोडली आहेत? तू किती गर्विष्ठ आहेस आणि तुझे हृदय किती दुष्ट आहे हे मी जाणतो; तू येथे खाली केवळ युद्ध पाहायला आला आहेस.”
दावीद म्हणाला, “मी काय केले आहे? मी बोलूपण नये काय?” नंतर तो दुसर्या कोणाकडे वळला आणि तोच विषय पुढे नेला आणि त्यांनीही आधीप्रमाणेच उत्तर दिले. दावीद जे बोलला ते कोणी ऐकले व ते शौलाला कळविले, तेव्हा शौलाने त्याला बोलावून घेतले.
दावीद शौलाला म्हणाला, “या पलिष्ट्यामुळे कोणी मनुष्याने खचून जाऊ नये; तुमचा सेवक पुढे जाऊन त्याच्याशी लढेल.”
शौलाने दावीदाला उत्तर दिले, “या पलिष्ट्यांविरुद्ध लढण्यास तू सक्षम नाहीस; तू केवळ कोवळा तरुण आहेस आणि तो त्याच्या तारुण्यापासून योद्धा आहे.”
परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले, मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले. आपल्या दासाने सिंह व अस्वल हे दोन्ही मारले; हा बेसुंती पलिष्टीही त्यापैकी एकासारखा असेल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सेनेचा उपहास केला आहे. ज्या याहवेहने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजांतून सोडविले, तेच याहवेह मला या पलिष्ट्यांपासूनही सोडवेल.”
शौल दावीदाला म्हणाला, “जा, याहवेह तुझ्याबरोबर असो.”
शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला.
तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला.