YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 17:1-19

1 शमुवेल 17:1-19 MRCV

पलिष्ट्यांनी युद्धासाठी आपले सैन्य गोळा केले आणि ते यहूदीयातील सोकोह येथे जमले. त्यांनी सोकोह आणि अजेकाह यांच्यामध्ये एफेस-दम्मिम येथे छावणी दिली. शौल आणि इस्राएली लोक जमले आणि त्यांनी एलाहच्या खोर्‍यात छावणी दिली आणि पलिष्ट्यांशी युद्ध करण्यासाठी सेनेचे नियोजन केले. पलिष्टी लोक एका टेकडीवर सज्ज झाले आणि दुसर्‍यावर इस्राएली लोक सज्ज झाले; व त्यांच्यामध्ये खोरे होते. तेव्हा गथ येथील, गल्याथ नामक एक महाशूरवीर, पलिष्ट्यांच्या छावणीतून बाहेर आला, त्याची उंची सहा हात आणि एक वीत. त्याच्या डोक्यावर कास्याचा टोप होता, त्याने खवल्यासारखे कास्याचे चिलखत घातले होते; ज्याचे वजन पाच हजार शेकेल होते; त्याच्या पायात त्याने कास्याचे संरक्षण कवच घातले होते व त्याच्या कंबरेला कास्याची बरची लटकलेली होती. विणकर्‍याच्या काठीसारखा त्याचा भाला होता आणि त्याच्या लोखंडी पात्याचे वजन सहाशे शेकेल होते. त्याचा ढाल वाहक त्याच्यापुढे चालत गेला. गल्याथ उभा राहिला आणि इस्राएली सैन्याला ओरडून म्हणाला, “तुम्ही युद्ध रचण्यासाठी बाहेर येऊन का उभे आहात? मी पलिष्टी नाही काय आणि तुम्ही शौलाचे चाकर नाहीत काय? तुमच्यातील एक मनुष्य निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. जर तो माझ्याशी लढून मला मारू शकेल तर आम्ही तुमची प्रजा होऊ; परंतु जर मी त्याच्यावर मात केली आणि त्याला मारले, तर तुम्ही आमची प्रजा होऊन आमची सेवा कराल.” तो पलिष्टी म्हणाला, “आज मी इस्राएली सैन्याला चेतावणी देतो! माझ्याकडे एक मनुष्य पाठवा म्हणजे आम्ही एकमेकांशी लढू.” पलिष्ट्याचे हे शब्द ऐकून शौल आणि सर्व इस्राएली लोक घाबरून गेले. दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता. इशायाचे तीन थोरले पुत्र; प्रथमपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शम्माह हे युद्धासाठी शौलाच्या सेवेत गेले होते. दावीद सर्वांहून धाकटा होता. थोरले तीन शौलाबरोबर गेले, परंतु दावीद बेथलेहेमात आपल्या वडिलांची मेंढरे चारण्यासाठी शौलाकडून जात येत असे. तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे. एके दिवशी इशाय त्याचा पुत्र दावीदाला म्हणाला, “एक एफाभर भाजलेले हे धान्य आणि या दहा भाकरी तुझ्या भावांसाठी लवकर छावणीत घेऊन जा. त्याचबरोबर खव्याचे हे दहा लाडू त्यांच्या तुकडीच्या सेनापतीसाठी घे, तुझे भाऊ कसे आहेत ते पाहा आणि परत येताना त्यांच्याकडून काही शांतीची बातमी घेऊन ये. ते शौल आणि सर्व इस्राएली लोकांबरोबर एलाहच्या खोर्‍यामध्ये पलिष्ट्यांविरुद्ध युद्ध करीत आहेत.”

1 शमुवेल 17 वाचा