YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 8:54-66

1 राजे 8:54-66 MRCV

शलोमोनने वेदीसमोर गुडघे टेकून व स्वर्गाकडे हात पसरून याहवेहची प्रार्थना करून संपविल्यावर तो याहवेहच्या वेदीपुढून उठला. त्याने उभे राहून सर्व इस्राएली मंडळीला उंच आवाजात असे म्हणत आशीर्वाद दिला: “याहवेह धन्यवादित असोत, त्यांनी आपल्या अभिवचनानुसार त्यांच्या इस्राएली लोकांना विसावा दिला आहे. त्यांचा सेवक मोशेद्वारे जी चांगली अभिवचने याहवेहने दिली त्यातील एकही निष्फळ झाले नाही. याहवेह आमचे परमेश्वर जसे आमच्या पूर्वजांसह होते तसेच ते आम्हासोबतही असो; त्यांनी कधीही आमचा त्याग करू नये. आम्ही त्यांच्या मार्गात चालावे आणि आमच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा व विधी आम्ही पाळावे म्हणून त्यांनी आमची मने आपल्याकडे वळवावी. आणि ज्या या शब्दांनी मी याहवेहसमोर प्रार्थना केली आहे त्या याहवेह आमच्या परमेश्वरापुढे रात्रंदिवस असो, यासाठी की रोजच्या गरजेनुसार ते आपल्या सेवकाला व आपल्या इस्राएली लोकांना साहाय्य करो. म्हणजे पृथ्वीवरील सर्व लोकांनी ओळखावे की याहवेह हेच परमेश्वर आहेत आणि दुसरा कोणीही नाही. आणि आज आहे त्याप्रमाणे तुम्ही याहवेहच्या विधीनुसार राहावे व त्यांच्या आज्ञा पाळाव्या म्हणून तुमची मने याहवेह आमच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित असावी.” नंतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेल्या सर्व इस्राएली लोकांनी याहवेहसमोर यज्ञे अर्पण केली. शलोमोनने शांत्यर्पणासाठी जी अर्पणे केली ती: बावीस हजार गुरे, एक लाख वीस हजार मेंढरे व बोकडे होती. याप्रकारे राजाने व सर्व इस्राएली लोकांनी याहवेहच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. त्याच दिवशी राजाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधला भाग पवित्र केला आणि तिथे त्याने होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे ही अर्पण केली, कारण याहवेहपुढे जी कास्याची वेदी होती ती होमार्पणे, धान्यार्पणे व शांत्यर्पणाची मांदे यासाठी फार लहान होती. तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर त्यावेळी सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे रहिवासी आले होते. त्यांनी याहवेह आमच्या परमेश्वरापुढे सात दिवस व आणखी सात दिवस असे मिळून चौदा दिवस उत्सव साजरा केला. आठव्या दिवशी त्याने लोकांना रवाना केले. तेव्हा त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आणि याहवेहने आपला सेवक दावीद व इस्राएलच्या लोकांसाठी जी सर्व चांगली कृत्ये केली त्यासाठी त्यांच्या अंतःकरणात हर्ष आणि आनंद होता.

1 राजे 8 वाचा