YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 6:14-38

1 राजे 6:14-38 MRCV

शलोमोनने मंदिर बांधून पूर्ण केले. त्याने मंदिराच्या आतील भिंतींना, जमिनीपासून छप्परापर्यंत गंधसरूच्या पट्ट्या लावल्या व जमिनीला गंधसरूच्या फळ्या केल्या. मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला. या खोलीच्या समोरची मुख्य खोली चाळीस हात लांब होती. मंदिराचा आतील भाग गंधसरूचा होता व त्यावर कळ्या व उमललेली फुले कोरली होती. दगड दृष्टीस पडू नये, म्हणून सर्वकाही गंधसरूचे बनविले गेले होते. याहवेहच्या कराराचा कोश ठेवण्यासाठी त्याने मंदिराच्या आतील भागात पवित्रस्थान बनविले. आतील पवित्रस्थान वीस हात लांब, वीस हात रुंद व वीस हात उंच होते. त्याच्या आतील भागावर व गंधसरूच्या वेदीला त्याने शुद्ध सोन्याचे आवरण दिले होते. शलोमोनने मंदिराच्या आतील भागाला शुद्ध सोन्याचे आच्छादन घातले, आणि पवित्रस्थानाच्या समोरून आतील बाजूने सोन्याच्या साखळ्या आडव्या लावल्या, व त्यांना देखील सोन्याचे आवरण दिले. अशाप्रकारे त्याने संपूर्ण मंदिर सोन्याने मढविले. आतील पवित्रस्थानातील वेदीला सुद्धा त्याने सोन्याचे आवरण दिले. आतील पवित्रस्थानासाठी त्याने जैतून लाकडाचे दोन करूब तयार केले. प्रत्येक दहा हात उंच होते. पहिल्या करुबाचे एक पंख पाच हात आणि दुसरे पंख पाच हात लांब होते; एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते. दुसरा करूब सुद्धा दहा हाताच्या मापाचा होता, कारण दोन्ही करूब एकसारख्याच मापाचे व आकाराचे होते. प्रत्येक करुबाची उंची दहा हात होती. त्याने ते करूब, त्यांचे पंख पसरलेले असे मंदिराच्या अगदी आतील खोलीत ठेवले. एका करुबाचे पंख एका भिंतीला स्पर्श करत होते, तर दुसऱ्या करुबाचे पंख दुसर्‍या भिंतीला स्पर्श करत होते आणि त्यांचे पंख खोलीच्या मध्यभागी एकमेकांना स्पर्श करत होते. त्याने करुबांना सोन्याचे आवरण दिले. मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या भिंतीवर सभोवार करूब, खजुरीची झाडे व उमललेली फुले कोरली होती. त्याने मंदिराच्या आतील व बाहेरील खोल्यांच्या जमिनीला सुद्धा सोन्याचे आवरण दिले. मंदिराच्या आतील प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाचे दरवाजे बनविले, ज्यांची रुंदी पवित्रस्थानाच्या पाचव्या भागाइतकी होती. त्यातील जैतून लाकडाच्या दोन दारांवर सोन्याचे ठोकलेले करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली. त्याच प्रकारे, मुख्य खोलीच्या प्रवेशद्वारासाठी त्याने जैतून लाकडाच्या कपाळपट्ट्या बनविल्या ज्यांची रुंदी भिंतीच्या चौथ्या भागाइतकी होती. त्याने देवदारू लाकडाचे सुद्धा दोन दरवाजे बनविले, जे दोन्ही बाजूंनी दुमडले जात होते. त्यावरही त्याने एकसारखे ठोकलेल्या सोन्याचे काम करून करूब, खजुरीची झाडे आणि उमललेली फुले कोरली. आणि त्याने आतील अंगणात वळणदार दगडांच्या तीन रांगा आणि छाटलेल्या गंधसरूच्या तुळयांची एक रांग बनविली. चौथ्या वर्षी, सीव महिन्यात याहवेहच्या मंदिराचा पाया घातला गेला. अकराव्या वर्षी, आठव्या महिन्यात; म्हणजे बूल महिन्यात, त्याच्या तपशील व नमुन्याप्रमाणे मंदिराचे बांधकाम संपले. शलोमोनला मंदिर बांधण्यासाठी सात वर्षे लागली.

1 राजे 6 वाचा