YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 20:23-43

1 राजे 20:23-43 MRCV

त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू. मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा. तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले. पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले. जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले. बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला. त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.” तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.” त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!” राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले. बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले. याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला. तेव्हा संदेष्टा म्हणाला, “कारण तू याहवेहचा शब्द मानला नाहीस, तू माझ्यापासून जाताच एक सिंह तुला मारून टाकील.” आणि तो मनुष्य जाताच सिंहाने त्याला गाठले व मारून टाकले. मग संदेष्ट्याने आणखी एका मनुष्याला म्हटले, “कृपया माझ्यावर वार कर.” तेव्हा त्या मनुष्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले. नंतर संदेष्टा जाऊन राजाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. त्याने आपल्या पागोट्याने आपले डोळे झाकून घेऊन आपले रूप बदलले होते. राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत भरावा लागेल.’ आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.” “आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.” तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले. संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ” तेव्हा इस्राएलचा राजा खिन्न व रागाने भरून शोमरोनातील आपल्या राजवाड्याकडे गेला.

1 राजे 20 वाचा