YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथकरांस 15:20-38

1 करिंथकरांस 15:20-38 MRCV

परंतु निश्चित ख्रिस्त मेलेल्यातून उठविले गेले आहेत; जे निद्रा पावलेले आहेत त्यातील ते प्रथमफळ आहे. कारण जसा एका मनुष्याद्वारे मृत्यू आला, तसाच या एका मनुष्याद्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण आदामामध्ये सर्व मरण पावतात, तसेच ख्रिस्तामुळे सर्व जिवंत करण्यात येतील प्रत्येकजण आपआपल्या क्रमाप्रमाणे उठेल: प्रथमफळ ख्रिस्त; नंतर जेव्हा ते येतील तेव्हा जे त्यांचे आहेत ते उठतील. नंतर शेवट होईल, त्यांनी सर्व सत्ता, अधिकार आणि सामर्थ्य नष्ट केल्यावर ख्रिस्त आपले राज्य परमेश्वर पित्याला सोपवून देतील. कारण त्यांचे सर्व शत्रू पायाखाली ठेवीपर्यंत त्यांना राज्य करणे भाग आहे. शेवटचा शत्रू जो मृत्यू, त्याचाही नाश केला जाईल. कारण त्यांनी “सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या आहेत.” आता जेव्हा असे म्हटले आहे की, “सर्वकाही” त्यांच्या अधिकाराखाली ठेवले आहे, यावरून स्पष्ट होते की ज्यांनी “सर्वकाही” ख्रिस्ताच्या अधीन केले आहे आणि त्या सर्वकाहीमध्ये परमेश्वराचा समावेश नाही. हे सर्व त्यांनी केल्यानंतर, पुत्र स्वतः त्यांच्या अधीन होईल ज्या परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की परमेश्वराने सर्वात सर्वकाही व्हावे. जर पुनरुत्थान नाही, तर काहीजणांनी मृतांच्यावतीने बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी काय करावे? जर मृत झालेले पुन्हा कधीच जिवंत होणार नसतील तर लोकांनी त्यांच्याबद्दल बाप्तिस्मा घेण्याची काय गरज आहे? आणि प्रत्येक वेळेस आम्ही तरी आमचे प्राण धोक्यात का घालावे? निश्चित, मी दररोज मृत्यूला तोंड देतो. मला ख्रिस्त येशू आपला प्रभू यामध्ये तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. जर पृथ्वीवरील आशेने इफिस येथील हिंस्र पशूंशी मनुष्यांसारखे लढण्यात आले तर मला काय लाभ झाला? जर मेलेले पुन्हा जिवंत होणार नाही तर, “चला, आपण खाऊ आणि पिऊ, कारण उद्या आपण मरणार आहोत.” तुम्ही फसविले जाऊ नका: “वाईटाची संगती चांगल्या चरित्रांना बिघडवते.” तुम्ही शुद्धीवर यावयास हवे आणि पाप करणे सोडून द्या; पण परमेश्वरासंबंधात काहीजण अज्ञानी आहेत मी हे तुम्हाला लाज वाटावी म्हणून बोलतो. आता कोणी विचारेल, “मरण पावलेले कसे जिवंत होतील? आणि त्यांची शरीरे कोणत्या प्रकारची असतील?” किती मूर्खपणा! जे तुम्ही पेरता, ते जर मेले नाही तर त्यातून जीवन येत नाही. तुम्ही बी पेरता, तेव्हा तुम्ही त्याचे शरीर पेरीत नाही, तर फक्त बी पेरता, कदाचित ते गव्हाचे किंवा दुसर्‍या कशाचे तरी असते. मग परमेश्वर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याला शरीर देतो आणि प्रत्येक प्रकारच्या बीजाला ते त्याचे स्वतःचेच शरीर देतात.