YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 15:1-16

रोमकरांना 15:1-16 MACLBSI

आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे. आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे. ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले. जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी. धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो. त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा. जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा; कारण मी तुम्हांला सांगतो, परमेश्वर एकनिष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी व पूर्वजांस दिलेली अभिवचने पूर्ण करण्यासाठी ख्रिस्त यहुदी लोकांचा सेवक झाला. तसेच यहुदीतरांनीदेखील देवाच्या दयेबद्दल त्याचा गौरव करावा. धर्मशास्त्रात असे लिहिले आहे: यहुदीतरांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. यहुदीतरांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा! धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे: सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे: आणखी यशया पुन्हा म्हणतो, ‘इशायाचा वंशज उदयास येईल, तो यहुदीतरांवर अधिकार चालविण्याकरिता येईल, यहुदीतर त्याची आशा बाळगतील.’ आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुमच्याविषयी माझी स्वतःची खातरी झाली आहे. परंतु मला देवापासून प्राप्त झालेल्या संधीमुळे मी तुम्हांला आठवण देऊन काहीशा धैर्याने लिहिले आहे. ती संधी अशी की, मी यहुदीतरांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे. देवाचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी एखाद्या याजकाप्रमाणे मी सेवा करतो अशासाठी की, यहुदीतरांनी पवित्र आत्म्याने पवित्र होऊन आपणास समर्पित करावे.