YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 7:4-17

प्रकटी 7:4-17 MACLBSI

ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. प्रत्येक वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. इस्त्राएली लोकांचे बारा वंश पुढीलप्रमाणे: यहुदा, रऊबेन, गाद, आशेर, नफताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामीन. ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते उच्च स्वराने म्हणत होते, “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडे व कोकराकडे तारण आहे.” तेव्हा राजासन, वडीलजन व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!” तेव्हा वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?” मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील. ते ह्यापुढे भुकेले व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही भस्मसात करणारी उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”