तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने येशूला कळकळीने विनंती केली, “माझी लहान मुलगी अत्यंत आजारी आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” तो त्याच्याबरोबर निघाला. पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती चोहीकडून गर्दी करत होते. बारा वर्षे रक्तस्रावाने पीडलेली एक स्त्री तेथे होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून इलाज करून घेताना स्वतःजवळ होते नव्हते, ते सर्व खर्च करून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता उलट तिचा रोग बळावला होता. तिने येशूविषयी ऐकले होते म्हणून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला तिने स्पर्श केला, कारण ती म्हणत असे, “केवळ ह्याच्या वस्त्रांना मी स्पर्श केला तरी मी बरी होईन.” तिने त्याच्या झग्याला स्पर्श केला आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला व आपण स्वतःच्या पीडेपासून बरे झालो आहोत, अशी तिला जाणीव झाली. स्वतःमधून शक्ती निघाली आहे, हे येशूने लगेच ओळखले आणि गर्दीकडे वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोणी स्पर्श केला?” त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करत आहे, हे आपण पाहता तरी आपण विचारता, ‘मला कोणी स्पर्श केला?’” जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीतभीत व थरथर कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तान्त सांगितला. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”
मार्क 5 वाचा
ऐका मार्क 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 5:22-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ