साबाथनंतर मग्दालिया मरिया, याकोबची आई मरिया व सलोमे ह्यांनी जाऊन येशूच्या शरीराला लावण्याकरता सुगंधी द्रव्ये विकत घेतली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस सूर्योदयाच्या समयी त्या कबरीजवळ आल्या. त्या एकमेकींना म्हणत होत्या, “आपल्याकरता कबरीवरून शिळा कोण सरकवील?” त्यांनी वर पाहिले, तेव्हा ती शिळा एकीकडे सरकवलेली आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. ती तर फारच मोठी होती. त्या कबरीच्या आत गेल्या तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित झाल्या. तो त्यांना म्हणाला, “चकित होऊ नका, क्रुसावर खिळलेल्या नासरेथकर येशूचा तुम्ही शोध घेत आहात ना? तो उठला आहे. तो येथे नाही. त्याला ठेवले होते, ती ही जागा पाहा. जा. त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्यापुढे गालीलमध्ये जात आहे. त्याने तुम्हांला सांगितले होते, त्याप्रमाणे तो तेथे तुमच्या दृष्टीस पडेल.” त्या कबरीतून बाहेर येऊन धावत निघाल्या. त्या शोकमग्न व भयभीत झाल्या होत्या. त्यांनी कोणाला काही सांगितले नाही कारण त्यांचा थरकाप उडाला होता. आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी प्रातःकाळी येशूचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मग्दालिया मरियेला दर्शन दिले, हिच्यामधून त्याने सात भुते काढली होती. तिने जाऊन शोक करत व रडत असलेल्या येशूच्या सोबत्यांना हे वर्तमान सांगितले. परंतु तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता, हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण गावाकडे जात असताना त्यांच्यासमोर तो निराळ्या प्रकारे प्रकट झाला. त्यांनी जाऊन इतरांना सांगितले. परंतु त्यांनी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. शेवटी अकरा जण जेवायला बसले असता त्यांच्यासमोरही तो प्रकट झाला. ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते, त्यांच्यावर ह्या अकरा जणांनी विश्वास ठेवला नाही म्हणून येशूने अविश्वास व अंतःकरणाचा कठोरपणा ह्यांविषयी त्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर तो त्यांना म्हणाला, “सर्व जगात जाऊन सर्व लोकांना शुभवर्तमानाची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही त्याला दोषी ठरवण्यात येईल. विश्वास धरणाऱ्यांना ही चिन्हे करता येतील:ते माझ्या नावाने भुते काढतील, नव्या भाषा बोलतील; सर्प उचलतील, ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी त्यांना बाधा होणार नाही व त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.” ह्याप्रमाणे त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर प्रभू येशू वर स्वर्गात घेतला गेला आणि तो देवाच्या उजवीकडे स्थानापन्न झाला. त्यांनी तेथून निघून शुभवर्तमानाची घोषणा सर्वत्र केली. त्या वेळी प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणाऱ्या चिन्हांद्वारे त्यांच्या संदेशाचे समर्थन करत होता.]
मार्क 16 वाचा
ऐका मार्क 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 16:1-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ