YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:27-47

मार्क 15:27-47 MACLBSI

त्यांनी त्याच्याबरोबर एक उजवीकडे व एक डावीकडे असे दोन लुटारूदेखील क्रुसावर खिळले. [‘तो अपराध्यांत गणला जाईल’, हा धर्मशास्त्रलेख त्या वेळी पूर्ण झाला.] जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी हालवत त्याची निंदा केली, “अरे मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, स्वतःला वाचव, क्रुसावरून खाली ये!” तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह येशूचा उपहास करीत आपसात म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही! इस्राएलचा राजा ख्रिस्त ह्याने आता क्रुसावरून खाली यावे, म्हणजे ते पाहून आमचा विश्वास बसेल.” येशूबरोबर क्रुसावर खिळलेलेसुद्धा त्याची निंदा करत होते. मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला. दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.” त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन आंबेत भिजवलेला स्पंज एका काठीच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, “थांबा! एलिया त्याला क्रुसावरून खाली उतरून घ्यायला येतो की काय हे पाहू!” येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” काही महिलादेखील दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. तो गालीलमध्ये असताना ह्या त्याच्याबरोबर फिरून त्याची सेवा करत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमहून आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रियादेखील होत्या. ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे साबाथपूर्व दिवस होता. म्हणून अरिमथाईकर योसेफने हिंमत धरून पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य होता आणि तो स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. येशू इतक्यात कसा निधन पावला, ह्याचे पिलातला आश्‍चर्य वाटले. त्याने सैन्याधिकाऱ्याला बोलावून घेऊन विचारले, “येशूला प्राण सोडून बराच वेळ झाला की काय?” सैन्याधिकाऱ्याचा अहवाल ऐकल्यावर त्याने येशूचे शरीर योसेफच्या स्वाधीन करण्यास संमती दिली. योसेफने तागाचे कापड आणले व शरीर खाली काढून ते तागाचे कापड त्याच्याभोवती गुंडाळले. त्यानंतर त्याने ते खडकात खोदलेल्या कबरीत ठेवले व कबरीच्या तोंडाशी शिळा सरकवून लावली. येशूला कोठे ठेवले, हे मग्दालिया मरिया व योसेची आई मरिया ह्या लक्षपूर्वक पाहत होत्या.