पहाट होताच वडीलजन व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलातच्या स्वाधीन केले. पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण तसे म्हणता.” मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप करीत होते. पिलातने त्याला पुन्हा विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? पाहा, ते तुझ्यावर किती तरी आरोप करीत आहेत.” तरी येशूने काही उत्तर दिले नाही. पिलातला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसांत लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करत, त्याला तो त्यांच्याकरता सोडून देत असे. बंडात भाग घेणाऱ्यांतील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर अटक केलेला बरब्बा नावाचा एक माणूस होता. लोकसमुदाय पुढे येऊन पिलातला विनवू लागला, “आपण आपल्या रिवाजाप्रमाणे करावे.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुमच्याकरता मी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” मुख्य याजकांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे पिलात ओळखून होता. परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला सोडा, ही मागणी करायला मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथावले. पिलातने त्यांना पुन्हा विचारले, “तर मग तुम्ही ज्याला यहुदी लोकांचा राजा म्हणता, त्याचे मी काय करावे?” “त्याला क्रुसावर खिळा”, अशी त्यांनी ओरड केली. पिलातने त्यांना म्हटले, “का? त्याने काय गुन्हा केला आहे?” तेव्हा ते अधिकच ओरडून म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” लोकसमुदायाला खुश करावे, ह्या हेतूने पिलातने बरब्बाला त्यांच्याकरता सोडून दिले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. शिपायांनी त्याला राज्यपालांच्या वाड्यात नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलावली. त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झगा चढवला आणि काटेरी डहाळ्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर घातला. ते मुजरा करून त्याला म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” त्यांनी त्याच्या मस्तकावर काठीने मारले, ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला बाहेर घेऊन गेले. गावातून शहराकडे जायला निघालेला शिमोन नावाचा माणूस त्यांना वाटेत भेटला. शिपायांनी त्याच्यावर बळजबरी करून त्याला येशूचा क्रूस वाहण्यास भाग पाडले. शिमोन कुरेनेकर होता व आलेक्झांद्र व रूफ ह्यांचा तो बाप होता. त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागेवर आणले. त्यानंतर त्यांनी येशूला गंधरस मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. त्यानंतर त्यांनी त्याला क्रुसावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणते कपडे कोणी घ्यावे ह्यासाठी चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. त्यांनी त्याला क्रुसावर खिळले, तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. ‘यहुदी लोकांचा राजा’, अशी त्याच्यावरील दोषारोपाची पाटी क्रुसावर लावली होती.
मार्क 15 वाचा
ऐका मार्क 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मार्क 15:1-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ