YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:66-72

मार्क 14:66-72 MACLBSI

इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली. पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!] त्या दासीने त्याला तेथेही पाहिले. जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” तरी त्याने पुन्हा नाकारले. काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालीली आहेस.” परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.” त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.