YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 14:53-72

मार्क 14:53-72 MACLBSI

नंतर त्यांनी येशूला उच्च याजकांच्या घरी नेले. तेथे सर्व मुख्य याजक, वडीलजन व शास्त्री एकत्र जमले. काही अंतर ठेवून मागे येत असलेला पेत्र रक्षकांबरोबर उच्च याजकांच्या वाड्यातील शेकोटीजवळ बसला. मुख्य याजक व न्यायसभेचे सर्व सदस्य येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध पुरावा शोधत होते, परंतु त्यांना तो मिळेना. बऱ्याच जणांनी येशूविरुद्ध खोट्या साक्षी दिल्या, परंतु त्यांच्या साक्षींत मेळ बसेना. काही जण उभे राहून येशूविरुद्ध खोटी साक्ष देऊन म्हणाले, “‘हातांनी बांधलेले हे मंदिर मी मोडून टाकीन व हातांनी न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसांत उभारीन’,असे आम्ही ह्याला बोलताना ऐकले.” परंतु त्यांच्या ह्या साक्षींतदेखील मेळ बसेना. उच्च याजकांनी मध्ये उभे राहून येशूला विचारले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?” तरी पण येशू गप्प राहिला. त्याने काही उत्तर दिले नाही. पुन्हा उच्च याजकांनी त्याला विचारले, “धन्य देवाचा पुत्र जो ख्रिस्त, तो तू आहेस काय?” येशू म्हणाला, “मी आहे. तुम्ही मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ परमेश्‍वराच्या उजवीकडे बसलेला व आकाशातील मेघांवर आरूढ होऊन येत असलेला पाहाल.” तेव्हा उच्च याजक आपले कपडे फाडून म्हणाले, “आपल्याला आणखी साक्षीदारांची काही गरज नाही! हे दुर्भाषण तुम्ही ऐकले आहे, तुमचा निर्णय काय?” त्या वेळी तो मरणदंडाला पात्र आहे, असे सर्वांनी मिळून ठरवले. कित्येक जण त्याच्यावर थुंकू लागले, त्याचे डोळे झाकून व त्याला बुक्क्या मारून म्हणू लागले, “आता संदेष्टा म्हणून सांग.” रक्षकांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले व चपराका मारल्या. इकडे पेत्र खाली अंगणात असता उच्च याजकांच्या दासींपैकी एक तेथे आली. पेत्राला शेकत असताना पाहून तिने त्याच्याकडे टक लावून म्हटले, “तूही त्या नासरेथकर येशूबरोबर होतास.” परंतु तो नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही व समजतही नाही.” त्यानंतर तो बाहेर देवडीवर गेला, [इतक्यात कोंबडा आरवला!] त्या दासीने त्याला तेथेही पाहिले. जे लोक जवळ उभे होते, त्यांना ती पुन्हा सांगू लागली, “हा त्यांच्यापैकीच आहे.” तरी त्याने पुन्हा नाकारले. काही वेळाने जवळ उभे राहणारे लोक पेत्राला पुन्हा म्हणाले, “तू खरोखर त्यांच्यापैकी आहेस कारण तू गालीली आहेस.” परंतु तो स्वतःला शाप देऊन शपथपूर्वक म्हणू लागला, “ज्या माणसाविषयी तुम्ही बोलत आहात, त्याला मी ओळखत नाही.” त्याच वेळी दुसऱ्यांदा कोंबडा आरवला. तेव्हा ‘कोंबडा दोन वेळा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील’, असे जे येशू पेत्राला म्हणाला होता, ते त्याला आठवले आणि तो भावनाविवश होऊन रडला.