YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 28:8-15

मत्तय 28:8-15 MACLBSI

तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता येशू त्यांना वाटेत अचानक भेटून म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याची आराधना केली. येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.” त्या स्त्रिया जात असता, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी शहरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले, “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे. ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.” त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे.