ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले. ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही. त्याला क्रुसावर खिळल्यानंतर त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे. त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे. जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.” तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे. त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.” जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली. दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
मत्तय 27 वाचा
ऐका मत्तय 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 27:32-46
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ