YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:27-66

मत्तय 27:27-66 MACLBSI

नंतर राज्यपालांच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याला जांभळा झगा घातला आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून ते उपहासाने म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले. अशा प्रकारे त्याचा उपहास केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून तो झगा काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि क्रुसावर खिळण्याकरता ते त्याला घेऊन गेले. ते बाहेर जात असता शिमोन नावाचा एक कुरेनेकर मनुष्य त्यांना दिसला. त्याला शिपायांनी येशूचा क्रुस वाहायला भाग पाडले. ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. तेथे त्यांनी येशूला विनेगर मिसळलेला द्राक्षारस प्यायला दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर त्याने तो घेतला नाही. त्याला क्रुसावर खिळल्यानंतर त्यांनी चिठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्यावर लावला तो असा: हा यहुदी लोकांचा राजा येशू आहे. त्या वेळी त्यांनी येशूबरोबर दोन दरोडेखोर क्रुसावर चढवले होते - एक त्याच्या उजवीकडे तर दुसरा त्याच्या डावीकडे. जवळून जाणारे येणारे डोकी हालवत येशूची निंदा करत होते, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, तू देवाचा पुत्र असलास, तर स्वतःचा बचाव कर आणि क्रुसावरून खाली उतर.” तसेच मुख्य याजकदेखील शास्त्री व वडीलजन ह्यांच्याबरोबर त्याचा उपहास करत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे. त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.” जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली. दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलियाला हाक मारतो.” त्यांच्यातून एकाने त्वरित धावत जाऊन स्पंज घेतला, तो आंबेत भिजवला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला. इतर म्हणाले, “थांब, एलिया त्याचा बचाव करायला येतो का, हे आपण पाहू.” नंतर येशूने पुन्हा मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला! त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली. खडक फुटले. थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले. ते थडग्यांतून निघून येशूच्या पुनरुत्थानानंतर पवित्र शहरात गेले आणि अनेकांच्या दृष्टीस पडले. रोमन अधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, “खरोखर हा देवाचा पुत्र होता.” तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसे ह्यांची आई मरिया व जब्दीची पत्नी ह्यांचा समावेश होता. संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला. म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले. ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच साबाथच्या दिवशी, मुख्य याजक व परुशी पिलातसमोर जमून म्हणाले, “महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून आपण तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करायला सांगा, नाही तर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील व तो मेलेल्यांतून उठला आहे, असे लोकांना सांगतील. मग शेवटची फसगत पहिल्यापेक्षा अधिक वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.” तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला.