YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:55-75

मत्तय 26:55-75 MACLBSI

त्या घटकेस येशू लोकसमुदायाला म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरायला तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात शिकवत असता तुमच्याबरोबर असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही. मात्र संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” त्या वेळी सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला उच्च याजक कयफा ह्यांच्याकडे नेले. तेथे शास्त्री व वडीलजन जमले होते. परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला. मुख्य याजक व सर्व न्यायसभा येशूला ठार मारण्याकरता त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होती. परंतु बरेच खोटे साक्षीदार जमले असताही तसा पुरावा त्यांना मिळाला नाही. शेवटी दोघे जण पुढे येऊन म्हणाले, “‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.” उच्च याजक उठून येशूला म्हणाले, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत ना?” तथापि येशू काही बोलला नाही. तेव्हा उच्च याजकांनी पुन्हा त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” येशू त्यांना म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.” त्या वेळी उच्च याजकांनी त्यांचीं वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे, आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? आत्ता तुम्ही ह्याचे दुर्भाषण ऐकले आहे. तुमचा निर्णय काय?” त्यांनी उत्तर दिले, “हा मरणदंडाला पात्र आहे.” ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले, “अरे ख्रिस्ता, संदेष्टा म्हणून आम्हांला सांग, तुला कोणी मारले?” इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता, तेव्हा उच्च याजकांची एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” परंतु तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.” पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यांच्यापैकी आहेस; कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे कळते.” तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला! ‘कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील’, असे जे येशूने पेत्राला सांगितले होते, ते त्याला आठवले. तो बाहेर गेला व भावनाविवश होऊन रडला.