तुम्हांला काय वाटते ते सांगा बरे? एका मनुष्याला दोन मुलगे होते. तो मोठ्या मुलाकडे जाऊन म्हणाला, “मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर.’ त्याने उत्तर दिले, “जातो, बाबा.’ पण तो गेला नाही. मग धाकट्या मुलाकडे जाऊन त्या मनुष्याने तसेच म्हटले. तो म्हणाला, “मी नाही जाणार.’ तरी पण नंतर आपला विचार बदलून तो गेला. ह्या दोघांतून कोणी त्याच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे केले?” ते म्हणाले, “धाकट्या मुलाने.” येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जकातदार व वेश्या तुमच्या आधी देवाच्या राज्यात जात आहेत. कारण योहान नीतिमत्वाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; शिवाय हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता, असा पश्चात्ताप नंतरही तुम्हांला झाला नाही. आणखी एक दाखला ऐकून घ्या. एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षारसासाठी कुंड खणले व माळा बांधला. त्यानंतर तो द्राक्षमळा कुळांकडे खंडाने देऊन तो स्वतः परदेशी गेला. फळांचा हंगाम आल्यावर त्याने त्याचे फळ घेण्याकरता आपल्या दासांना कुळांकडे पाठवले. त्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोकले, कोणाला ठार मारले व कोणाला धोंडमार केला. पुन्हा त्याने पहिल्यापेक्षा अधिक दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. ‘माझ्या मुलाचा ते मान राखतील’, असा विचार करून द्राक्षमळ्याच्या मालकाने शेवटी त्याच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु मुलाला पाहून कुळे आपसात म्हणाली, “हा तर वारस आहे, चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ.’ त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. आता हे सांगा, द्राक्षमळ्याचा धनी येईल, तेव्हा तो त्या कुळांचे काय करील?” ते येशूला म्हणाले, “तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जी कुळे हंगामाच्या वेळी त्याला फळ देतील, अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल.” येशू त्यांना म्हणाला, “‘जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापंसत केला, तो कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे!’, असे धर्मशास्त्रात तुम्ही कधी वाचले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेतले जाईल व त्याची फळे देणाऱ्या लोकांना ते दिले जाईल. जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल. परंतु ज्या कुणावर हा पडेल त्याचा हा भुगा करून टाकील.” मुख्य याजक व परुशी ह्यांनी हा दाखला ऐकला तेव्हा तो त्यांना उद्देशून सांगितला होता, हे त्यांच्या ध्यानात आले. तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण लोक त्याला संदेष्टा मानत होते.
मत्तय 21 वाचा
ऐका मत्तय 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 21:28-46
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ