ते यरुशलेमजवळ आले असता ऑलिव्ह डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले, तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले, “तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे लगेच तुम्हांला एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू बांधलेले आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा. तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.”
संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे:
सियोनकन्येला सांगा,
‘पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे.
तो नम्र आहे म्हणून तो गाढवावर व
गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’
शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला. लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”
तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?”
लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.”
येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली आणि त्यांना म्हटले, “‘माझ्या मंदिराला प्रार्थनागृह म्हणतील’, असे लिहिले आहे, पण तुम्ही तर ही लुटारूंची गुहा करून टाकली आहे.”
तेथे आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. त्याने केलेले चमत्कार पाहून व “दावीदपुत्राचा गौरव असो!”, असा जयघोष करणारी मुले मंदिरात पाहून मुख्य याजक व शास्त्री संतापले आणि त्याला म्हणाले, “ही मुले काय बोलतात, हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “हो, “बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करविली आहेस’, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
नंतर तो त्यांना सोडून शहराबाहेर बेथानीस गेला व तेथे तो रात्रभर राहिला.
सकाळी येशू परत शहराकडे येत असता त्याला भूक लागली, म्हणून तो वाटेवर असलेल्या अंजिराच्या झाडाजवळ गेला. पण पानांशिवाय त्याला त्यावर काही दिसले नाही. त्याने त्या झाडाला म्हटले, “ह्यापुढे तुला कधी फळ न येवो.” ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले!
ते पाहून शिष्यांनी आश्चर्य व्यक्त करून म्हटले, “अंजिराचे झाड इतक्या लवकर कसे वाळून गेले?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर ह्या झाडाला मी जे केले, ते तुम्हीही करू शकाल, इतकेच नव्हे तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’, असे म्हणाल तर तसे होईल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल, ते सर्व तुम्हांला मिळेल.”
येशू मंदिरात शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन विचारू लागले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला एक प्रश्न विचारतो, त्याचे तुम्ही मला उत्तर दिले तर कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करतो, ते मीही तुम्हांला सांगेन. योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून?” ते आपसात चर्चा करू लागले, “देवाकडून म्हणावे तर तो आपल्याला म्हणेल, “मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ बरे, माणसाकडून म्हणावे, तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला संदेष्टा मानतात.” तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” तो त्यांना म्हणाला, “तर मग मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे, ते मीही तुम्हांला सांगणार नाही.