एकदा शिष्य येशूकडे येऊन विचारू लागले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वांत मोठा कोण?”
तेव्हा त्याने एका लहान मुलाला घेऊन त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, तुमचे परिवर्तन होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुम्हांला मुळीच प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो, तो स्वर्गाच्या राज्यात मोठा होय. तसेच जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो.
माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ह्या लहानांतील एकाला जो कोणी पापास प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्राच्या खोल पाण्यात बुडवावे, हे त्याच्या हिताचे आहे. अडखळण होणे ही जगासाठी किती भयानक गोष्ट आहे! अशी अडखळणे अवश्य घडणार. परंतु ज्याच्याकडून ती अडखळणे घडतील त्याची केवढी दुर्दशा होणार!
तुझा हात किंवा तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो तोडून फेकून दे, दोन हात किंवा दोन पाय असून न विझणाऱ्या अग्नीत पडण्यापेक्षा लुळे किंवा लंगडे होऊन जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळे असून नरकाग्नीत पडण्यापेक्षा एक डोळा असून जीवनात जावे, हे तुझ्या हिताचे आहे.
सांभाळा, ह्या लहानांतील एकालाही तुच्छ मानू नका. मी तुम्हांला सांगतो, त्यांचे दिव्य दूत माझ्या स्वर्गातील पित्यापुढे नित्य उपस्थित असतात.
[जे हरवलेले आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मनुष्याचा पुत्र आला आहेर्.]
तुम्हांला काय वाटते? एका माणसाजवळ शंभर मेंढरे असली आणि त्यांतून एखादे भटकले तर टेकडीवर चरत असलेल्या नव्याण्णव मेंढरांना सोडून जे एक भटकले आहे त्याला शोधायला तो जाणार नाही काय? आणि समजा, ते त्याला सापडले तर न भटकलेल्या नव्याण्णवांपेक्षा तो सापडलेल्या मेंढराबद्दल अधिक आनंद व्यक्त करणार नाही का? त्याप्रमाणे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा, अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.
तुझा भाऊ तुझा अपराधी असेल तर त्याच्याकडे जा. तुम्ही दोघे एकांती असताना त्याचा अपराध काय ते त्याला सांग. त्याने तुझे ऐकले तर तू आपला भाऊ मिळवलास, असे होईल. परंतु त्याने जर ऐकले नाही, तर तू आणखी एका दोघांना आपणाबरोबर घे. अशासाठी की, दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध व्हावा आणि जर त्याने त्यांचेही ऐकले नाही तर मंडळीला कळव. जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही, तर तो तुला निधर्मी किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, ते स्वर्गात बांधले जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल, ते स्वर्गात मोकळे केले जाईल.
मी आणखी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीविषयी एकचित्त होऊन विनंती करतील, तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी मान्य केली जाईल; कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.”