YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 15:1-28

मत्तय 15:1-28 MACLBSI

यरुशलेमहून काही परुशी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले, “तुमचे शिष्य वाडवडिलांच्या रूढीप्रमाणे का चालत नाहीत? ते हात न धुता जेवतात.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही स्वतःची परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा का मोडता? देवाने असे म्हटले आहे, “तू तुझे वडील व तुझी आई ह्यांचा मान राख आणि जो कोणी वडिलांची किंवा आईची निंदा करतो, त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’ परंतु तुम्ही म्हणता, जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, “मी तुम्हांला जे काही द्यायला हवे होते, ते मी देवाला अर्पण केले आहे’, अशा माणसाने आपल्या वडिलांचा अथवा आईचा सन्मान केला नाही तरी चालेल. अशा प्रकारे, तुम्ही आपली परंपरा चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. अहो ढोंग्यांनो, तुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. धर्मशास्त्र म्हणून ते माझी व्यर्थ उपासना करतात कारण ते मनुष्यांचे नियम शिकवतात.” नंतर येशूने लोकसमुदायाला आपल्याकडे बोलावून म्हटले, “ऐका व समजून घ्या. जे तोंडातून आत जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर जे तोंडातून बाहेर निघते ते माणसाला अशुद्ध करते.” नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले, “हे वचन ऐकून परुश्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, हे आपल्याला कळले काय?” त्याने उत्तर दिले, “माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही, असे प्रत्येक रोपटे उपटले जाईल. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खड्ड्यात पडतील.” परंतु पेत्र त्याला म्हणाला, “हा दाखला आम्हांला समजावून सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तुम्हीदेखील अज्ञानी आहात काय? जे काही तोंडात जाते, ते पोटात उतरते व नंतर पुढे शरीराबाहेर टाकण्यात येते, हे तुम्हांला समजत नाही काय? मात्र जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला अशुद्ध करते. अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार आणि लैंगिक अनैतिकता, तसेच चोऱ्या, खोट्या साक्षी व निंदानालस्ती निघतात. ह्या गोष्टी माणसाला अशुद्ध करतात. न धुतलेल्या हातांनी जेवणे माणसाला अशुद्ध करत नाही.” येशू तेथून निघून सोर व सिदोन ह्या भागात गेला. त्या भागातील एक कनानी बाई येऊन ओरडू लागली, “हे प्रभो, दावीदपुत्रा, माझ्यावर दया करा. माझ्या मुलीला एक भूत फारच त्रास देत आहे.” तरी येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आपल्यामागून ओरडत येत आहे.” त्याने उत्तर दिले, “इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांसाठीच मला पाठवलेले आहे.” ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, “प्रभो, मला साहाय्य करा.” त्याने उत्तर दिले, “मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही.” तिने म्हटले, “खरे आहे, प्रभो, तरीही कुत्रीदेखील आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चुरा खातात.” नंतर येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो!” आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली!