YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 14:3-21

मत्तय 14:3-21 MACLBSI

हेरोदने त्याचा भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानला बांधून कैदेत टाकले होते; कारण योहानने त्याला म्हटले होते, “तू तिला ठेवावेस हे योग्य नाही.” तेव्हापासून तो त्याला ठार मारायला पाहात होता, पण तो यहुदी लोकांना भीत होता कारण ते योहानला संदेष्टा मानत असत. पुढे हेरोदचा वाढदिवस आला तेव्हा हेरोदियाच्या कन्येने दरबारात नृत्य करून हेरोदला खूष केले. त्यावरून त्याने तिला शपथपूर्वक वचन दिले, “तू जे काही मागशील, ते मी तुला देईन.” तिच्या आईने तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून मला आत्ता येथे आणून द्या.” राजाला वाईट वाटले, परंतु सर्व पाहुण्यांच्या देखत वाहिलेल्या शपथेमुळे त्याने ते द्यायचा आदेश दिला आणि माणूस पाठवून तुरुंगात योहानचा शिरच्छेद करविला. त्याचे शिर तबकात घालून मुलीला देण्यात आले आणि तिने ते आपल्या आईला दिले. नंतर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून नेला व पुरला आणि येशूला ही बातमी जाऊन कळवली. योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले. तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच.