येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.” येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.” दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. ‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले. लोकसमुदायास निरोप देऊन येशू घरात गेला तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाचा दाखला आम्हांला समजावून सांगा.” त्याने उत्तर दिले, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे, चांगले बी म्हणजे स्वर्गराज्याचे लोक आहेत. निदण म्हणजे सैतानाची प्रजा. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. कापणीची वेळ म्हणजे युगाच्या समाप्तीचा समय व कापणी करणारे हे देवदूत आहेत. जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या शेवटी होईल. मनुष्याचा पुत्र त्याच्या दूतांना पाठवील आणि ते अडथळे आणणाऱ्या व अनाचार करणाऱ्या सर्वांना त्याच्या राज्यातून जमा करून अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. त्या वेळी नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे तळपतील. ज्याला कान आहेत त्याने ऐकावे! स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या खजिन्यासारखे आहे. तो एका मनुष्याला सापडतो. तो मनुष्य खजिना पुन्हा लपवून ठेवतो. नंतर तो आनंदाच्या भरात जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. तसेच स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध घेणाऱ्या एका व्यापाऱ्यासारखे आहे. त्याला असामान्य प्रतीचा एक मोती आढळला. त्याने जाऊन त्याचे सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. स्वर्गाचे राज्य हे सरोवरात टाकलेल्या जाळ्यासारखे आहे. त्यात सर्व प्रकारचे मासे एकत्र पकडले जातात. जाळे भरल्यावर कोळी लोक ते काठावर ओढतात आणि चांगले मासे भांड्यांत जमा करतात, पण खराब ते फेकून देतात. तसे युगाच्या शेवटी होईल, देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील व त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे आक्रोश व दात ओठ खाणे चालेल. तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य होतो, तो आपल्या भांडारातून जुन्या व नव्या गोष्टी बाहेर काढणाऱ्या घरमालकासारखा असतो.” हे दाखले सांगण्याचे पूर्ण केल्यावर येशू तेथून निघून गेला. स्वतःच्या गावी आल्यावर त्याने तेथील लोकांना सभास्थानात अशी शिकवण दिली की, ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून प्राप्त झाले? हा सुताराचा मुलगा ना? मरिया ह्याची आई ना? याकोब, योसे, शिमोन व यहुदा हे ह्याचे भाऊ ना? ह्याच्या सर्व बहिणी येथेच राहतात ना? मग हे सर्व ह्याला कोठून मिळाले?” आणि त्यांनी येशूचा अव्हेर केला. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला त्याच्या देशात व स्वतःच्या घरी सन्मान मिळत नाही.” तेथील लोकांच्या अविश्वासामुळे त्याने तेथे फारसे चमत्कार केले नाहीत.
मत्तय 13 वाचा
ऐका मत्तय 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 13:31-58
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ