YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:5-14

मत्तय 10:5-14 MACLBSI

ह्या बारा जणांना पाठवताना येशूने आदेश दिला, “परराष्ट्रीयांकडे जाणाऱ्या वाटेने जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर इस्राएलच्या घराण्यातील हरवलेल्या मेढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करा की, स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना बरे करा, भुते काढा, तुम्हांला मोफत मिळाले, मोफत द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या खिशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका कारण कामगार त्याच्या वेतनाला पात्र आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल, त्या त्या ठिकाणी उचित व्यक्तीचा शोध घ्या आणि तुम्ही तेथून निघून जाईपर्यंत तेथेच राहा. घरात प्रवेश करताना नमस्कार करा. ते घर पात्र असेल तर तुमची शांती त्याला मिळो परंतु ते अपात्र असेल तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा त्या नगरातून निघताना तुमच्या पायांची धूळ झटकून टाका.