YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:26-42

मत्तय 10:26-42 MACLBSI

तर मग तुम्ही त्यांना भिऊ नका. उघडकीस येणार नाही, असे काही झाकलेले राहणार नाही आणि प्रत्येक गुपित उघड केले जाईल. जे मी तुम्हांला अंधारात सांगतो त्याची उजेडात पुनरुक्ती करा आणि तुमच्या कानांत सांगितलेले जे तुम्ही ऐकता, ते छपरावरून घोषित करा. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा. दोन चिमण्यांची किंमत ती काय? पण तुमच्या पित्याच्या संमतीशिवाय त्यांतून एकही जमिनीवर पडत नाही. तसेच तुमच्या डोक्यावरचे सर्व केसदेखील मोजलेले आहेत. म्हणून भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे! जो कोणी इतरांसमोर मला पत्करील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन. परंतु जो कोणी इतरांसमोर मला नाकारील, त्याला मीही माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे. मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे. मनुष्याचे कुटुंबीयच त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही. जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल. जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. जो कोणी संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्याचे पारितोषिक मिळेल. जो कोणी नीतिमान माणसाचा नीतिमान माणूस म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान माणसाचे पारितोषिक मिळेल. ह्या लहानांतल्या एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो त्याला त्याचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हांला निक्षून सांगतो.”