YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 24:13-35

लूक 24:13-35 MACLBSI

त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते. घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते. ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले. त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?” तो त्यांना म्हणाला, “कोणत्या घटना?” त्यांनी त्याला म्हटले, “नासरेथकर येशूविषयीच्या. तो देवाच्या व सर्व लोकांच्या नजरेत कृतीने व उक्‍तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी देहान्ताच्या शिक्षेसाठी पकडून क्रुसावर चढवले. इस्राएलची मुक्‍ती करणारा तो हाच, अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी होऊन आज तीन दिवस झाले. आणखी आमच्यातील ज्या अनेक स्त्रिया भल्या पहाटेस कबरीकडे गेल्या होत्या, त्यांनी तर आम्हांला थक्कच केले. त्यांना त्याचे शरीर कबरीत सापडले नाही. त्यांनी येऊन म्हटले, ‘आम्हांला देवदूतांचे दर्शन झाले व देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.’ मग आमच्यापैकी काही जण कबरीकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले. मात्र त्यांना त्याचे शरीर दिसले नाही.” मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही किती निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यात किती मतिमंद आहात! ख्रिस्ताने ही दुःखे सोसावीत आणि आपल्या वैभवात प्रवेश करावा, हे क्रमप्राप्त नव्हते काय?” मग येशूने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण धर्मशास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. ज्या गावास ते जात होते, त्या गावाजवळ ते आले, तेव्हा त्याला जणू पुढे जायचे आहे, असे येशूने दाखवले. परंतु ते त्याला विनंती करून म्हणाले, “आमच्याबरोबर राहा, संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे.” तो त्यांच्याबरोबर वसती करायला आत गेला. तेथे तो त्यांच्याबरोबर जेवायला बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले आणि तो अंतर्धान पावला. ते एकमेकांना म्हणाले, “तो वाटेने आपल्याबरोबर बोलत होता व धर्मशास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपली अंतःकरणे आपल्याठायी धगधगत नव्हती काय?” त्याच घटकेस ते उठून यरुशलेम येथे परत गेले. तेथे अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबरचे लोक एकत्र जमलेले त्यांना आढळले. ते म्हणत होते की, प्रभू खरोखर उठला आहे व तो शिमोनच्या दृष्टीस पडला आहे. ह्या दोघा शिष्यांनी वाटेतल्या घटना त्यांना सांगितल्या व येशूने भाकर मोडली, तेव्हा आपण प्रभूला कसे ओळखले, हे निवेदन केले.