YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:1-12

लूक 23:1-12 MACLBSI

ती सर्व मंडळी उठली व त्यांनी येशूला पिलातकडे नेले. ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसरला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे, असे म्हणताना आम्हांला आढळला.” पिलातने त्याला विचारले, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” मुख्य याजकांना व लोकसमुदायाला पिलाताने म्हटले, “मला ह्या माणसात काही दोष आढळत नाही.” परंतु हे ऐकून ते अधिकच उग्र आविर्भावाने म्हणाले, “ह्याने गालीलपासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहुदियात शिक्षण देत लोकांना चिथवले आहे.” हे ऐकून पिलातने हा मनुष्य गालीलकर आहे काय, असे विचारले, तो हेरोदच्या अंमलातला आहे, असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदकडे पाठवले कारण तोही त्या दिवसांत यरुशलेममध्ये होता. येशूला पाहून हेरोदला फार आनंद झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे, अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. येशूच्या हातून घडलेले एखादे चिन्ह पाहायला मिळेल, अशी त्याला आशा होती. त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते.