तो म्हणाला, “आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने एक उमराव दूर देशी जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याने त्याच्या दहा दासांना बोलावले व त्यांना प्रत्येकी एकेक सोन्याची मोहर देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत हिच्या साहाय्याने व्यापार करा.’ त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग प्रतिनिधी पाठवून कळवले, ‘ह्याने आम्हांवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही.’
तो राजा होऊन परत आल्यावर त्याच्या दासांनी व्यापारात काय काय मिळविले, हे पाहावे म्हणून त्याने त्यांना स्वतःकडे बोलावण्यास सांगितले. पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर मी तुला अधिकार देईन.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही मी पाच नगरांवर अधिकार देईन.’
त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांत तुझा न्याय करतो. मी कठोर माणूस आहे, जे मी ठेवले नाही, ते घेतो व जे मी पेरले नाही, त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ ‘मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, त्याचे जे आहे, तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल. परंतु ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये, असे होते, त्यांना येथे आणा व माझ्यासमोर ठार मारा.’”