YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 13:1-22

लूक 13:1-22 MACLBSI

ज्या गालीलकरांचे रक्त पिलातने त्यांच्या यज्ञात मिसळले होते त्यांच्याविषयी त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी येशूला सांगितले. त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “ह्या गालीलकरांचा अशा प्रकारे अंत झाला ह्यावरून बाकीच्या सर्व गालीलकरांपेक्षा ते अधिक पापी होते, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या अठरा जणांवर शिलोहमधील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेममध्ये राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते, असे तुम्हांला वाटते काय? मी तुम्हांला सांगतो, नव्हते. मात्र जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही, तर तुम्हां सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल.” येशूने त्यांना हा दाखला सांगितला:“कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला परंतु त्याला काही आढळले नाही. त्याने माळ्याला म्हटले, ‘पाहा, गेली तीन वर्षे मी ह्या अंजिराच्या झाडावर फळ पाहायला येत आहे परंतु मला काही फळ आढळत नाही म्हणून ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी?’ त्याने त्याला उत्तर दिले, ‘महाराज, एवढे वर्ष ते राहू द्या, मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. त्यानंतर त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण ते तोडून टाकू शकता.’” येशू साबाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेथे अठरा वर्षे दुष्ट आत्म्याने पीडलेली एक स्त्री होती. ती कुबडी असल्यामुळे तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून जवळ बोलावले व म्हटले, “बाई, तू आपल्या पीडेपासून मुक्‍त झाली आहेस.” त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णन करू लागली. येशूने साबाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “जेव्हा काम केले पाहिजे, असे सहा दिवस आहेत, तर त्या दिवसांत येऊन बरे व्हा. साबाथ दिवशी येऊ नका.” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, “अहो ढोंग्यांनो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव साबाथ दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेतो ना? ही तर अब्राहामाची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. साबाथ दिवशी हिला या बंधनातून सोडविणे योग्य नव्हते काय?” तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधक फजीत झाले आणि जी आश्‍चर्यकारक कृत्ये त्याच्याकडून होत होती, त्या सर्वांमुळे लोकसमुदायाला आनंद झाला. ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात लावला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यांवर राहू लागले.” तो पुन्हा म्हणाला, “मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” तो नगरोनगरी व खेडोपाडी शिक्षण देत यरुशलेमकडे जात होता

संबंधित व्हिडिओ