YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:5-80

लूक 1:5-80 MACLBSI

यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या कारकीर्दीत अबिजाच्या याजकीय संघात जखऱ्या नावाचा एक याजक होता, त्याची पत्नीदेखील अहरोनाच्या याजकीय कुळातील होती. तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात तत्पर होती. अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते व ती दोघे वयोवृद्ध झाली होती. एकदा जखऱ्या आपल्या संघाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे दैनंदिन काम करण्यासाठी गेला. याजकांच्या परिपाठाप्रमाणे वेदीवर धूप जाळण्यासाठी त्याची निवड चिट्ठ्या टाकून करण्यात आली होती. त्यानुसार तो प्रभूच्या मंदिरात गेला. त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला. परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील! कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल; त्याने द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करायचे नाही; आईच्या उदरात असल्यापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. एलियाच्या मनोवृत्तीने व सामर्थ्याने तो परमेश्वरापुढे चालेल. वडील आणि मुले यांच्यामध्ये तो पुन्हा ऐक्य प्रस्थापित करील. आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची विचारसरणी नीतिमान लोकांच्या विचारसरणीसारखी बदलून तो प्रभूसाठी प्रजा तयार करील.” जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी वयोवृद्ध आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. तुझ्याबरोबर बोलायला व हे सुवृत्त तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण उचित समयी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते. त्याला पवित्र स्थानात उशीर झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. त्यावरून त्याला पवित्र स्थानात दर्शन घडले आहे, असे त्यांनी ओळखले. बोलू न शकल्यामुळे तो त्यांना हातांनी खुणा करीत होता. त्याच्या सेवाकार्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी परत गेला. त्यानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने ती घरातून बाहेर पडली नाही. ती म्हणत असे, “लोकांत होणारी माझी मानहानी दूर करण्यासाठी प्रभूने मला साहाय्य केले.” अलिशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गालीलमधील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्‍चय झाला होता. तिचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर आहे.” परंतु ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल, ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला. त्या दिवसांत मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका नगरात त्वरेने गेली आणि जखऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले. अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उसळी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. ती उच्च स्वरांत म्हणाली, “सर्व स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या उदरातील फळ धन्य! माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, ही महान गोष्ट माझ्या बाबतीत का घडावी? कारण तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उसळी मारली. प्रभूने तुला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल, असा विश्वास ठेवणारी तू धन्य आहेस.” मरिया म्हणाली, “माझे अंतःकरण प्रभूला थोर मानते व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे, कारण त्याने त्याच्या सेविकेच्या नम्रतेवर कृपादृष्टी वळवली आहे! ह्यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील; कारण जो सामर्थ्यशाली आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्ये केली आहेत, त्याचे नाव पवित्र आहे. जे त्याचे भय बाळगतात, त्यांच्यावर त्याची कृपादृष्टी पिढ्यान्पिढ्या असते. त्याने आपल्या बाहूने पराक्रम केला आहे. जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे. त्याने अधिपतींना राजासनांवरून ओढून काढले आहे व दीनांना उच्च स्थान दिले आहे. त्याने भुकेल्यांना चांगल्या पदार्थांनी तृप्त केले आहे व धनवानांना रिकाम्या हातांनी पाठवून दिले आहे. त्याच्या दयेचे स्मरण ठेवून त्याचा सेवक इस्राएल ह्याला त्याने साहाय्य केले आहे. आपल्या पूर्वजांना म्हणजेच अब्राहाम व त्याच्या वंशजांना दिलेल्या वचनानुसार त्याने हे केले आहे.” मरिया सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली. अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर विशेष दया केली, हे ऐकून तिचे शेजारी व नातलग तिच्याबरोबर आनंदित झाले. आठव्या दिवशी ते बालकाची सुंता करायला आले. त्याच्या वडिलांच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते, परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको, ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे.” ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही.” म्हणून ह्याचे नाव काय ठेवायचे आहे, असे त्यांनी त्याच्या वडिलांना खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून ह्याचे नाव योहान आहे, असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. लगेच त्याचे तोंड उघडले. त्याची जीभ मोकळी झाली व तो देवाचा गौरव करीत बोलू लागला. ह्यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले. यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व घडामोडींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या घटनांवर मनन करीत म्हटले, “हा बालक होणार तरी कोण?” कारण खरोखर त्याच्या ठायी प्रभूचे सामर्थ्य होते. नंतर योहानचे वडील जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला तो असा: ‘इस्राएलचा प्रभू परमेश्वर ह्याचा आपण गौरव करू या. त्याने लोकांवर कृपादृष्टी वळवली असून त्याने त्यांचे तारण केले आहे. त्याने आपल्याला त्याचा सेवक दावीद ह्याचा वंशज सामर्थ्यशाली तारणहार म्हणून दिला आहे. त्याने युगाच्या प्रारंभापासून त्याच्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते, ‘आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून तो आपली सुटका करील.’ अशा प्रकारे आपल्या पूर्वजांना त्याने दया दाखवली आहे व त्याच्या पवित्र कराराचे स्मरण ठेवले आहे. आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले. म्हणजे आपण त्याच्यापुढे जीवनभर पवित्र व नीतिमान असावे आणि हे माझ्या मुला, तुला परात्पराचा संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्यापुढे चालशील, त्यांना पापांची क्षमा मिळून त्यांचा उद्धार होईल, असे तू परमेश्वराच्या लोकांना सांगशील. अंधारात व मृत्युच्छायेत बसलेल्यांना त्याने प्रकाश द्यावा आणि आमच्या पायांना शांतीचा मार्ग दाखवावा म्हणून परमेश्वराच्या कोमल करुणेने उद्धाराची पहाट उगवेल.” तो बालक वाढत असता त्याचा आत्मिक विकास होत गेला आणि इस्राएली लोकांसमोर जाहीरपणे प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1