YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:5-22

लूक 1:5-22 MACLBSI

यहुदियाचा राजा हेरोद ह्याच्या कारकीर्दीत अबिजाच्या याजकीय संघात जखऱ्या नावाचा एक याजक होता, त्याची पत्नीदेखील अहरोनाच्या याजकीय कुळातील होती. तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात तत्पर होती. अलिशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते व ती दोघे वयोवृद्ध झाली होती. एकदा जखऱ्या आपल्या संघाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे दैनंदिन काम करण्यासाठी गेला. याजकांच्या परिपाठाप्रमाणे वेदीवर धूप जाळण्यासाठी त्याची निवड चिट्ठ्या टाकून करण्यात आली होती. त्यानुसार तो प्रभूच्या मंदिरात गेला. त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता. धूप जाळले जात असताना प्रभूचा दूत वेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखऱ्या विस्मित व भयभीत झाला. परंतु देवदूताने त्याला म्हटले, “जखऱ्या, भिऊ नकोस! तुझी विनंती ऐकण्यात आली आहे. तुझी पत्नी अलिशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल. तू त्याचे नाव योहान असे ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील! कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल; त्याने द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करायचे नाही; आईच्या उदरात असल्यापासून तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. इस्राएलच्या संतानांतील पुष्कळ लोकांना तो प्रभू त्यांचा परमेश्वर ह्याच्याकडे वळवील. एलियाच्या मनोवृत्तीने व सामर्थ्याने तो परमेश्वरापुढे चालेल. वडील आणि मुले यांच्यामध्ये तो पुन्हा ऐक्य प्रस्थापित करील. आज्ञाभंग करणाऱ्या लोकांची विचारसरणी नीतिमान लोकांच्या विचारसरणीसारखी बदलून तो प्रभूसाठी प्रजा तयार करील.” जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी वयोवृद्ध आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. तुझ्याबरोबर बोलायला व हे सुवृत्त तुला कळवायला मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. तुला बोलता येणार नाही, कारण उचित समयी पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते. त्याला पवित्र स्थानात उशीर झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. त्यावरून त्याला पवित्र स्थानात दर्शन घडले आहे, असे त्यांनी ओळखले. बोलू न शकल्यामुळे तो त्यांना हातांनी खुणा करीत होता.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1