इकडे लोक जखऱ्याची वाट पाहत होते. त्याला पवित्र स्थानात उशीर झाल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना. त्यावरून त्याला पवित्र स्थानात दर्शन घडले आहे, असे त्यांनी ओळखले. बोलू न शकल्यामुळे तो त्यांना हातांनी खुणा करीत होता. त्याच्या सेवाकार्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी परत गेला. त्यानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने ती घरातून बाहेर पडली नाही. ती म्हणत असे, “लोकांत होणारी माझी मानहानी दूर करण्यासाठी प्रभूने मला साहाय्य केले.” अलिशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गालीलमधील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. तिचा दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाबरोबर वाङ्निश्चय झाला होता. तिचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर आहे.” परंतु ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल, ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे आणि पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. प्रभू परमेश्वर त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. तो याकोबच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया धरील. ह्यामुळे तुला होणारे मूल पवित्र असेल व त्याला देवाचा पुत्र म्हणतील. तसेच पाहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिला म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे. जिला वांझ म्हणत, तिला सहावा महिना लागला आहे. कारण देवाला काहीच अशक्य नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची सेविका आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो.” मग देवदूत तेथून निघून गेला.
लूक 1 वाचा
ऐका लूक 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 1:21-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ