शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल ते चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर चिठ्या टाकल्या’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.
येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”
नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटले, ‘मला तहान लागली आहे’.
तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झुडपाच्या फांदीवर ठेवून त्याच्या तोंडाला लावला. आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
तो साबाथच्या तयारीचा दिवस होता, साबाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत, कारण तो साबाथ महापवित्र दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे, अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली.
म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर क्रुसावर चढवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले, परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. तुम्हीही विश्वास ठेवावा म्हणून ज्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो, हे त्याला ठाऊक आहे. ‘त्याचे हाड मोडले जाणार नाही’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. शिवाय दुसऱ्याही धर्मशास्त्रलेखात असे म्हटले आहे, ‘ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.’
त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने पिलातला अशी विनंती केली की, त्याला येशूचे शरीर नेऊ द्यावे. यहुदी लोकांच्या भयामुळे तो येशूचा गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यानंतर तो येशूचे शरीर घेऊन गेला. येशूकडे पूर्वी एका रात्री आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे तीस किलो मिश्रण घेऊन तेथे आला. त्या दोघांनी येशूचे शरीर घेऊन त्याला यहुदी लोकांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्ये लावली व ते कापडात गुंडाळले. येशूला क्रुसावर खिळले होते, त्या ठिकाणी एक बाग होती. तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवलेले नव्हते. तो यहुदी लोकांच्या साबाथच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले कारण ती कबर जवळ होती.