दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले. त्यांना विटाळ होऊ नये व त्यांना ओलांडण सणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत. पिलात स्वतः त्यांच्याकडे बाहेर येऊन म्हणाला, “तुम्ही ह्या माणसावर कोणता आरोप ठेवता?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “हा गुन्हेगार नसता, तर आम्ही त्याला तुमच्या स्वाधीन केले नसते.” पिलात त्यांना म्हणाला, “त्याला नेऊन तुम्हीच तुमच्या नियमशास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करा.” यहुदी त्याला म्हणाले, “आम्हांला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही.” कोणत्या प्रकारच्या मरणाने तो मरणार हे सुचवताना येशूने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहुदी लोकांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतःहून हे म्हणता की, दुसऱ्यांनी आपल्याला माझ्याविषयी हे सांगितले?” पिलातने उत्तर दिले, “मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले. तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते, तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य येथले नाही.” तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे, असे आपण म्हणता. सत्याविषयी साक्ष द्यावी म्हणून माझा जन्म झाला आहे व ह्याकरता मी जगात आलो आहे. जो कोणी सत्याची बाजू घेतो तो माझी वाणी ऐकतो.” पिलातने त्याला विचारले, “सत्य काय आहे?” नंतर तो पुन्हा बाहेर जाऊन यहुदी लोकांना म्हणाला, “मला ह्याच्यात काहीच दोष सापडत नाही. पण ओलांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसाला सोडावे अशी तुमची रीत आहे तर मग मी तुमच्यासाठी यहुदी लोकांच्या राजाला सोडावे, अशी तुमची इच्छा आहे काय?” तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.
योहान 18 वाचा
ऐका योहान 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 18:28-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ