YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 18:1-18

योहान 18:1-18 MACLBSI

ह्या प्रार्थनेनंतर येशू त्याच्या शिष्यांसह किद्रोन ओहोळाच्या पलीकडील बागेत गेला. ही जागा त्याचा विश्‍वासघात करणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती. कारण येशू त्याच्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी आणि मुख्य याजक व परुशी ह्यांच्याकडच्या रक्षकांसह यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. त्याच्या बाबतीत घडणाऱ्या सर्व गोष्टी जाणून असल्यामुळे, येशू बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” त्यांनी त्याला उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” त्याला धरून देणारा यहुदा इस्कर्योत त्यांच्याबरोबर तेथे उभा होता. ‘तो मी आहे’, असे येशूने म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. तेव्हा येशूने त्यांना पुन्हा विचारले, “तुम्ही कोणाला शोधत आहात?” ते म्हणाले, “नासरेथकर येशूला.” येशू म्हणाला, “तो मी आहे, असे मी तुम्हांला सांगितले. तुम्ही मला शोधत असाल तर ह्यांना जाऊ द्या.” ‘तू मला दिले आहेत त्यांतून मी एकही हरवला नाही’, हे त्याचे वचन पूर्ण व्हावे, म्हणून तो हे बोलला. शिमोन पेत्राजवळ तलवार होती. ती त्याने उपसून उच्च याजकांच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला. त्या दासाचे नाव मल्ख होते. येशू पेत्राला म्हणाला, “तलवार म्यानात घाल. पित्याने जो दुःखाचा प्याला मला दिला आहे, तो मी पिऊ नये काय?” त्यानंतर सैनिकांची तुकडी, तिचे अधिकारी व यहुदी अधिकाऱ्यांनी पाठवलेले रक्षक ह्यांनी येशूला धरून बांधले. त्यांनी त्याला प्रथम हन्‍नाकडे नेले. त्या वर्षी उच्च याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांसाठी मरावे, हे हिताचे आहे, असा ह्याच कयफाने यहुदी लोकांना स्रा दिला होता. शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य येशूच्या मागे गेले. तो शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता म्हणून तो येशूबरोबर उच्च याजकांच्या वाड्यात गेला. पेत्र दाराशी बाहेर उभा राहिला होता म्हणून जो दुसरा शिष्य उच्च याजकांच्या ओळखीचा होता त्याने बाहेर जाऊन व द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत आणले. ती तरुण द्वारपालिका पेत्राला म्हणाली, “तू त्या माणसाच्या शिष्यांपैकी आहेस ना?” त्याने म्हटले, “मी नाही.” थंडी असल्यामुळे दास व रक्षक हे कोळशांचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते. त्यांच्याबरोबर पेत्रही शेकत उभा राहिला.

योहान 18:1-18 साठी चलचित्र