बेथानी ह्या गावी लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्यांचे हे गाव होते. हा आजारी पडलेला लाजर ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेलाचा अभिषेक केला होता व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले होते, तिचा भाऊ होता. त्या बहिणींनी येशूकडे निरोप पाठवला, “प्रभो, तुमचा प्रिय मित्र आजारी आहे.”
ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे, तर देवाच्या गौरवासाठी आहे, म्हणजे त्यामुळे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा.”
मार्था, तिची बहीण व लाजर ह्यांच्यावर येशूची प्रीती होती. तो आजारी आहे, हे येशूने ऐकले, तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.”
शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, तेथील लोक अलीकडेच तुमच्यावर दगडमार करू पहात होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाणार का?”
येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाही? जो दिवसा चालतो त्याला ठेच लागत नाही, कारण त्याला ह्या पृथ्वीवरचा उजेड दिसतो. परंतु तो रात्री चालला तर त्याला ठेच लागते, कारण तेव्हा उजेड नसतो.” हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.”
शिष्य त्याला म्हणाले, “प्रभो, त्याला झोप लागली असेल, तर त्याला बरे वाटेल.”
येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता, परंतु तो झोपेत विसावा घेण्याविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले. म्हणून येशूने त्यांना उघड सांगितले, “लाजर मरण पावला आहे.” तुम्ही विश्वास ठेवावा म्हणून मी तेथे नव्हतो, ह्याचा मला आनंद वाटतो. चला, आपण त्याच्याकडे जाऊ.”
तेव्हा ज्याला दिदुम म्हणजे जुऴा म्हणत तो थोमा आपल्या जोडीदार शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ!”
येशू बेथानीला आला तेव्हा त्याला कळले की, लाजरला कबरीत ठेवून चार दिवस झाले होते.