YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:1-23

इब्री 10:1-23 MACLBSI

तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून नियमशास्र प्रतिवर्षी अर्पण केल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी देवाजवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते, तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापांची जाणीव नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञामुळे वर्षानुवर्षे पापांचे स्मरण होत आहे; कारण बैलांचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. परिणामत: जगात येताना ख्रिस्त देवाला म्हणाला, यज्ञ व अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले; वेदीवर संपूर्ण प्राणी जाळल्याने व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष होत नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. वर उल्लेखिल्याप्रमाणे तो प्रथम म्हणाला, ‘यज्ञ, अर्पणे, होमार्पणे व पापांबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष होत नव्हता’; (नियमशास्त्राप्रमाणे जी अर्पण करण्यात येतात ती ही); आणि मग तो म्हणाला, ‘पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे’. ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या देवाच्या इच्छेनुसार आपण येशू ख्रिस्ताने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. पापे दूर करायला जे यज्ञ कदापि समर्थ नाहीत, तेच यज्ञ प्रत्येक यहुदी याजक प्रतिदिवशी सेवा करीत वारंवार अर्पण करीत उभा असतो; परंतु पापांबद्दल शाश्‍वत असा एकच यज्ञ अर्पण करून येशू देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून त्याचे वैरी त्याचे पादासन होईपर्यंत तो वाट पाहत आहे. म्हणजेच पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळाकरिता परिपूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो: परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा: मी माझे नियम त्यांच्या मनावर ठसवीन, ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन. त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे मुळीच लक्षात ठेवणार नाही. तर मग ज्याअर्थी त्यांना क्षमा झाली त्याअर्थी त्यांच्या पापांबद्दल अर्पण नाही. म्हणून, बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व शाश्‍वत जीवनाकडे नेणारा मार्ग आपल्यासाठी स्थापन केला त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य लाभले आहे. आपल्याकरिता देवाच्या मंदिराचा प्रमुख असा एक थोर याजक देण्यात आलेला आहे; म्हणून आपली हृदये शिंपडली गेल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण शाश्वतीने देवाच्या जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्याला मिळालेली आशा जाहीर करून दृढ बाळगू या; कारण ज्याने वचन दिले, तो विश्वासू आहे.