YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 5:7-26

गलतीकरांना 5:7-26 MACLBSI

तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले? तुम्हांला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते, असे म्हटले जाते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील. बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता. तुमच्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःचे खच्चीकरण करून घेतील तर बरे होईल. बंधुजनहो, तुम्हांला स्वातंत्र्यासाठी पाचारण केले आहे. परंतु त्या स्वातंत्र्याने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर एकमेकांची सेवा प्रीताने करा; ‘कारण जशी आपणावर, तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर,’ या एका आज्ञेत सर्व नियम सामावलेले आहेत. परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व गिळून टाकता तर सांभाळा, अन्यथा तुमच्या हातून एकमेकांचा संहार होईल. मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि देहवासना पूर्ण करू नका. देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरूद्ध आहे, दोन्ही परस्परविरुध्द आहे आणि ह्यामुळे जे काही तुम्ही करू इच्छिता ते तुमच्या हातून घडू शकत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, ती ही: जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, मत्सर, राग, भांडणतंटे, फुटिरता, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्यांविषयी मी तुम्हांला पूर्वी जे सांगून ठेवले होते, तेच आता सांगतो की, अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. परंतु आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, चांगुलपणा, औदार्य, विश्वासूपणा, सौम्यता व आत्मनियंत्रण हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांविरुद्ध स्पर्धा करणारे व एकमेकांचा हेवा करणारे असू नये.