YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 1:1-17

गलतीकरांना 1:1-17 MACLBSI

मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाद्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठविले तो देवपिता, ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून: गलतीया येथील ख्रिस्तमंडळीला आपला पिता देव व प्रभू येशू ख्रिस्त कृपा व शांती देवो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला अर्पण केले. परमेश्वराचा युगानुयुगे गौरव असो! मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले, त्याला सोडून तुम्ही इतक्या लवकर अन्य शुभवर्तमानाकडे वळत आहात. खरे म्हणजे दुसरे शुभवर्तमान नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत, म्हणून मी असे म्हणतो. परंतु जे आम्ही तुम्हांला सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान आम्ही किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो! आम्ही अगोदर सांगितले, तसे आता पुन्हा सांगतो की, तुम्ही स्वीकारले त्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापित असो! मी आता माणसाची मान्यता मिळवू पाहत आहे काय? मुळीच नाही! मला देवाची मान्यता हवी आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करू पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना खुश करत राहिलो असतो, तर मी ख्रिस्ताचा सेवक नसतो. बंधूंनो, मी तुम्हांला कळवू इच्छितो की, मी घोषित करीत असलेले शुभवर्तमान कुणा माणसाने सुरू केलेले नाही. कारण ते मला मनुष्याकडून प्राप्त झाले नाही आणि ते मला कोणी शिकवलेही नाही तर येशू ख्रिस्ताने स्वतः ते मला प्रकट करून दाखवले आहे. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या ख्रिस्तमंडळीचा निष्ठुरपणे छळ करत असे व तिचा विध्वंस करत असे. माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी फार आवेशी असल्यामुळे माझ्या समाजातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीत मी अधिक प्रगती केली होती. परंतु देवाने जन्मापूर्वीपासून माझी निवड केली व आपल्या कृपेने मला त्याची सेवा करण्यासाठी बोलावले. मी यहुदीतर लोकांमध्ये त्याच्या पुत्राच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी म्हणून जेव्हा त्याने मला त्याचा पुत्र प्रकट करून दाखवला, तेव्हा माणसांचा सल्‍ला न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे न जाता, मी अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिष्काला पुन्हा परत आलो.