YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 8:4-22

प्रेषितांचे कार्य 8:4-22 MACLBSI

ज्यांची पांगापांग झाली होती, ते श्रद्धावंत लोक तर शुभवर्तमान घोषित करीत चहूकडे फिरले. फिलिपने शोमरोन येथील मुख्य शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. फिलिपचे भाषण ऐकून व तो करत असलेली चिन्हे पाहून त्याने सांगितलेल्या गोष्टींकडे लोकसमुदायाने बारकाईने लक्ष दिले. ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते, त्यांच्यातील पुष्कळांतून अशुद्ध आत्मे किंचाळत निघून गेले. पुष्कळ पक्षाघाती व पांगळी माणसे बरी झाली. त्या नगरात आनंदीआनंद झाला. त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा शिमोन नावाचा एक माणूस होता. आपण कोणी तरी मोठे आहोत, असे तो दाखवत असे. लहानापासून थोरांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकत व म्हणत की, ‘हा माणूस म्हणजे जिला देवाची महाशक्ती म्हणतात, तिचाच अवतार आहे.’ त्याने त्यांना बऱ्याच दिवसांपासून आपल्या जादूगिरीने विस्मित केले होते, म्हणून त्यांचे लक्ष त्याच्यावर खिळले होते. तरी पण देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्यांविषयी फिलिप शुभवर्तमान घोषित करीत असता लोकांचा त्यावर विश्वास बसला आणि अनेक स्त्रीपुरुषांचा बाप्तिस्मा झाला. स्वतः शिमोननेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपच्या सहवासात राहिला. घडत असलेली चिन्हे व मोठे चमत्कार पाहून तो स्वतः आश्चर्यचकित झाला. शोमरोन येथील लोकांनी देवाचे वचन स्वीकारले आहे, असे यरुशलेममधल्या प्रेषितांनी ऐकले तेव्हा त्यांच्याकडे पेत्र व योहान ह्यांना पाठवले. ते तेथे आल्यावर त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रेषितांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. कारण तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा मात्र झाला होता. नंतर पेत्र व योहान ह्यांनी त्यांच्यावर हात ठेवून प्रार्थना केली आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषितांचे हात ठेवल्याने पवित्र आत्मा मिळतो, हे पाहून शिमोनने त्यांना पैसे दाखवून म्हटले, “ज्या कोणावर मी माझे हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळावा असा अधिकार मलाही द्या.” परंतु पेत्र त्याला म्हणाला, “पैसे देऊन देवाचे दान मिळवता येते, असा विचार केल्याबद्दल तुझ्या पैशाचा तुझ्याबरोबर नाश होवो. आमच्या सेवाकार्यात तुला भाग किंवा वाटा नाही कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने योग्य नाही. तुझ्या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप करून प्रभूला विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या विचारांची तुला क्षमा मिळेल.

प्रेषितांचे कार्य 8:4-22 साठी चलचित्र