YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 7:22-43

प्रेषितांचे कार्य 7:22-43 MACLBSI

मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी झाला. तो चाळीस वर्षांचा झाला, तेव्हा आपले बांधव म्हणजे इस्राएली लोक ह्यांची भेट घ्यावी, असे त्याच्या मनात आले. मोशेने त्यांतील कोणा एकावर एका मिसरी माणसाच्या हातून अन्याय होत असलेला पाहून त्या माणसाचा कैवार घेतला आणि मिसरी माणसाला ठार करून त्याचा सूड उगवला. देव त्याच्या हाताने त्याच्या बांधवांची सुटका करणार आहे, हे त्यांना समजेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. दुसऱ्या दिवशी दोन इस्राएली माणसे आपसात भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, “तुम्ही भाऊबंद आहात. एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा जो आपल्या सहकाऱ्यावर अन्याय करत होता, तो त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश म्हणून कोणी नेमले? काल तू मिसरी माणसाला ठार मारले, तसे मलाही मारावयाला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे पळून गेला आणि मिद्यान लोकांच्या देशात उपरी झाला. तेथे त्याला दोन मुलगे झाले. त्यानंतर चाळीस वर्षांनी सीनाय पर्वताजवळच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. हे दृश्य पाहून मोशेला आश्चर्य वाटले आणि ते काय आहे, हे पाहण्याकरता तो जवळ गेला. त्यावेळी प्रभूची वाणी झाली, ‘मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामचा, इसहाकचा व याकोबचा देव आहे.’ मोशे घाबरला व त्याला तिकडे पाहायचे धैर्य झाले नाही. प्रभूने त्याला म्हटले, ‘तू आपल्या पायांतले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. मिसर देशातल्या माझ्या लोकांचे हाल मी खरोखर पाहिले आहते, त्यांचे हुंदके मी ऐकले आहेत आणि त्यांना सोडवून घेण्यासाठी मी उतरलो आहे. तर आता चल, मी तुला मिसर देशात पाठवतो.’ ‘तुला सत्ताधिकारी व न्यायाधीश कोणी केले’, असे म्हणून ज्या मोशेला त्यांनी झिडकारले होते, त्यालाच, झुडपांत दर्शन झालेल्या देवदूताच्या साहाय्याने, देवाने सत्ताधिकारी व मुक्तिदाता म्हणून पाठवले. त्याने मिसर देशात, तांबड्या समुद्रात व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांना बाहेर नेले. तोच मोशे इस्राएली लोकांना म्हणाला, ‘मला पाठविले त्याप्रमाणे परमेश्वर तुमच्या बांधवांमधून एक संदेष्टा तुमच्यासाठी उत्पन्न करील.’ रानातील मंडळींबरोबर, सीनाय पर्वतावर मोशेशी बोलणाऱ्या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय. तो आपल्यासाठी जीवनदायक संदेश घेऊन आला. परंतु त्याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी त्याला धिक्कारले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हांला करून दे कारण ज्याने आम्हांला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले, ते आम्हांला माहीत नाही.’ त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ती बनवली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातून घडलेल्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. म्हणून देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशातील ताऱ्यांची पूजा करावयास सोडून दिले, ह्याविषयी संदेष्ट्यांच्या पुस्तकात लिहिले आहे: हे इस्राएलच्या घराण्या, तुम्ही चाळीस वर्षे अरण्यात पशू कापून मला यज्ञात अर्पण केले काय? मोलख दैवताचा मंडप व तुमचे मुख्य दैवत रेफान ह्याचा तारा ह्यांच्या प्रतिमा तुम्ही पुजण्याकरिता तयार केल्या म्हणून मी तुम्हांला बाबेलच्या पलीकडे नेऊन ठेवीन.

प्रेषितांचे कार्य 7:22-43 साठी चलचित्र